शारजा : ट्रेंट बोल्ट (४ बळी) आणि मार्क क्रेग (३ बळी) यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत पाकिस्तानचा एक डाव आणि ८० धावांनी पराभव केला़ या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली़पाकिस्तानने पहिल्या डावात ३५१ धावा केल्या होत्या़ प्रत्युत्तरात न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ६९० धावांचा डोंगर उभा करताना ३३९ धावांची आघाडी मिळविली होती़ पाक संघ सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ६३़३ षटकांत २५९ धावांत बाद झाला़ अशा प्रकारे या लढतीत न्यूझीलंडने एक डाव आणि ८० धावांनी सरशी साधली़पाकच्या दुसऱ्या डावात असद शफिक (१३७) याने एकतर्फी झुंज देताना शतकी खेळी केली़ याने आपल्या खेळीत १८ चौकार आणि ६ षटकार खेचले़ विशेष म्हणजे एकवेळ पाकची स्थिती ६ बाद ३६ अशी झाली होती; मात्र शफिक याने शतकी खेळी करून संघाचा पराभव लांबवला़ शफिक नवव्या गड्याच्या रूपात २५८ या स्कोअरवर बाद झाला़त्याआधी न्यूझीलंडने शारजा क्रिकेट स्टेडियमवर आपला सर्वाधिक कसोटी स्कोअर बनविला़ त्याचबरोबर किवी संघाने आपल्या डावात एकूण २२ षटकार लगावले़ हा विश्वविक्रम ठरला आहे़ या संघाने सकाळी ८ बाद ६३७ या स्कोअरपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ त्यांचा मार्क क्रेग तिसऱ्या दिवसअखेर ३४ धावांवर नाबाद होता़ त्याने चौथ्या दिवशी ६५ धावांची खेळी केली़ त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ३ षटकार लगावले़ (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडने पाकला डावाने हरविले
By admin | Updated: December 1, 2014 01:38 IST