रांची : येथील जयपाल सिंग स्टेडियममध्ये मंगळवारी शॉक लागून १९ वर्षीय राष्ट्रीय स्तराचा मल्ल विशाल कुमार वर्मा याचा मृत्युझाला. स्टेडियममध्ये असलेल्या कुस्ती संघटना कार्यालयाच्या बाहेर आणि आतमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये विद्युतप्रवाह झाल्यानंतर विशालला त्याचा जोरदार झटका बसला. यानंतर त्याला रुग्णालयात नेले, परंतु तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी विशालने कुस्ती संघटनेच्या कार्यालयात प्रवेश केला. त्याचवेळी, तेथील साचलेल्या पाण्यामध्ये विद्युतप्रवाह आला. विजेचा जोरदार झटका लागल्यानंतर विशाल जागीच कोसळला. यानंतर त्वरीत त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी काहीवेळानंतर मृत घोषित केले.राष्ट्रीय स्तरावरील मल्ल असलेला विशाल आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसनिरिक्षक शामानंदन मंडल जयपाल सिंग घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी त्यांनी तपासणी सुरु केली आहे. (वृत्तसंस्था)विशालच्या मृत्युची माहिती मिळताच रुग्णालयामध्ये क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी झाली. विशालच्या मृतदेहाचे श्ववविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी हरमू मुक्तिधाम येथे विशालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विशाल ५ मिनिटांपर्यंत जिवीत होता, त्यानंतर त्याने अखेरचा श्वास घेतला. विशालची कामगिरी..रांची येथील बडा तालाब परिसरात विशाल आपल्या पालकांसह राहत होता. दहा वर्षांपासून कुस्ती खेळत असलेल्या विशालने गतवर्षी वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या ७४ किलोवजनी गटात चौथे स्थान पटकावले होते. तसेच, राज्यस्तरावरही त्याने अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली होती.
पाण्यातून शॉक लागल्याने राष्ट्रीयस्तरीय मल्लाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:26 IST