नवी दिल्ली : दोहा येथे सुरूअसलेल्या सिनिअर आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या नरसिंग पंचम यादव याने पुरुषांच्या ७४ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे महिलांच्या फ्री स्टाईल ४८ किलो वजन गटात भारताच्या विनेश हिने अंतिम फेरीत धडक मारली.विनेशची कामगिरी शानदार ठरली, तर नरसिंग यादव मात्र सुदैवी ठरला आणि क्वालिफिकेशन फेरीत पराभूत झाल्यानंतरही तो कांस्यपदकाच्या प्ले आॅफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला.विनेशने आपल्या फायनलच्या प्रवासात उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या तातयाना अमनाजेल बकातयुकला पराभूत केले. त्याआधी त्याने उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या सोगतबातार ब्यामबाजया याचा ८-० असा पराभव केला होता.आॅलिम्पिकमध्ये २ पदके जिंकणाऱ्या सुशील कुमारच्या अनुपस्थितीत ७४ किलो वजन गटात खेळणारा नरसिंग क्वालिफिकेशन फेरीत जपानच्या दैसुक शिमादा याच्याकडून ९-१२ असा पराभूत झाला होता; परंतु जपानी पहिलवान फायनलमध्ये पोहोचल्याने त्याला प्लेआॅफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. कांस्यपदकाच्या लढतीत नरसिंगने कझाकिस्तानच्या जिगर जाकिरोव्ह याचा ३-१ असा धुव्वा उडवत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांच्या ७० किलो वजन गटात प्रवीण राणा कांस्यपदकाच्या प्ले आॅफ लढतीत जपानच्या तकाफुमी कोजिमाकडून पराभूत झाला. (वृत्तसंस्था)
नरसिंग यादवला कांस्य
By admin | Updated: May 9, 2015 00:37 IST