चेन्नई : येथील एम़ ए़ चिदम्बरम स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडक सामन्याचा पहिला दिवस ४० वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघाच्या चांगलाच लक्षात ‘राहिल़’ यजमान तामिळनाडू संघाच्या राहिल शाह याने अप्रतिम मारा करून मुंबईच्या सात फलंदाजांना बाद केले आणि त्यांचा पहिला डाव अवघ्या १४१ धावांत गुंडाळला. शाहला सुरेश कुमार (२) आणि मलोलान रंगराजन (१) यांनी चांगली साथ दिली. दिवसअखेर तामिळनाडूने ४ बाद १३६ धावांची मजल मारून मोठ्या आघाडीकडे वाटचाल केली आहे.गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा मुंबईचाय कर्णधार सूर्यकुमार यादव याचा हा निर्णय संघाच्या चांगलाच अंगाशी आला. पाचव्या षटकात सलामीवीर अखिलेश हेरवाडकर याला राहिल शाह याने झेलबाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर अनुभवी जाफर सामन्याची सूत्र सांभाळून मुंबईला या धक्क्यातून बाहेर काढेल असे वाटत होते, परंतु नवव्या षटकात शाहने भोपळ्यावर जाफरला माघारी धाडले. आदित्य तरे आणि श्रेयस अय्यर यांनी थोडा संघर्ष केला खरा, परंतु सुरेश कुमारने तरेला १७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार यादवही रंगराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला. बघता बघता मुंबईचा निम्मा संघ ८६ धावांत गडगडला. अय्यर एका बाजूने संघाचा डाव सांभाळून होता. मात्र, शाहच्या गोलंदाजीसमोर पाहुण्यांना फार काही करणे शक्य दिसत नव्हते. तळाचे पाच फलंदाज अवघ्या ५५ धावांत माघारी धाडून तामिळनाडूने मुंबईला १४१ धावांवर रोखले. अय्यरने ५६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ५० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूलाही सुरुवातीला धक्के बसले. सलामीवीर अभिनव मुकुंदला (७) शार्दूल ठाकूरने बाद केले, तर मुरली विजयला (२७) अक्षय गिराप याने बाद केले. मात्र त्यानंतर विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांनी तामिळनाडूचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. हेरवाडकरने कार्तिकला ४३ धावांवर माघारी धाडले आणि त्यापाठोपाठ आलेल्या औशिक श्रीनिवास यालाही शून्यावर बाद केले. दिवसअखेर शंकर नाबाद ४७ धावांवर आणि अपराजित शून्यावर खेळत आहेत. (वृत्तसंस्था)मुंबई : तरे झे. व गो. कुमार १७, हेरवाडकर झे. अपराजित गो. शाह २, जाफर झे. इंद्रजित गो. शाह ०, अय्यर झे. शंकर गो. शाह ५०, यादव झे. सतीश गो. रंगराजन ५, लाड झे. इंद्रजित गो. शाह १७, खान झे. रंगराजन गो. शाह २१, ठाकूर यष्टिचीत कार्तिक गो. शाह ६, अब्दुल्ला झे. व गो. शाह ११, गिराप नाबाद ६, दाभोळकर झे. इंद्रजित गो. कुमार ०.अवांतर - ६; एकूण - ४८.५ षटकांत सर्वबाद १४१ धावा़गोलंदाजी : शाह २०-७-३४-७, शंकर ५-३-१०-०, कुमार १३.५-०-५४-२, रंगराजन १०-३-३७-१. तामिळनाडू : विजय झे. हेरवाडकर गो. गिराप २७, मुकुंद झे. तरे गो. ठाकूर ७, शंकर नाबाद ४७, कार्तिक झे. अय्यर गो. हेरवाडकर ४३, श्रीनिवास त्रि. गो. हेरवाडकर ०, अपराजित नाबाद ०.अवांतर - १२; एकूण - ४३ षटकांत ४ बाद १३६ धावा़गोलंदाजी : ठाकूर ११-५-२२-१, अब्दुल्ला १२-०-३६-०, दाभोळकर ९-०-३९-०, गिराप ९-१-२८-१, हेरवाडकर २-१-५-२.
मुंबईच्या कायम लक्षात ‘राहिल’!
By admin | Updated: January 22, 2015 01:57 IST