विनय नायडू, मुंबई - मुंबई इंडियन्स प्लेआॅफसाठी पात्र ठरणार की, राजस्थान रॉयल्सला संधी मिळणार... याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आदित्य तारेने फॉकनरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि मुंबई इंडियन्सला ५ गडी राखून विजय मिळवून देताना संघाला प्लेआॅफमध्ये स्थान मिळवून दिले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या या ‘मिशन प्ले आॅ’ लढतीत शेवटी आदित्य तारेने मुंबईला तारले. मुंबईच्या विजयात कोरी अॅण्डरसन (नाबाद ९५ धावा, ४४ चेंडू, ९ चौकार, ६ षटकार) आणि अंबाती रायडू (३० धावा, १० चेंडू, ५ चौकार, १ षटकार) यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. यंदा प्लेआॅफमध्ये स्थान मिळविणारा मुंबई (१४ गुण) चौथा संघ ठरला. किंग्ज इलेव्हन पंजाब (२२ गुण), कोलकाता नाईट रायडर्स (१८ गुण) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (१८ गुण) यांनी अव्वल तीनमध्ये स्थान मिळवित यापूर्वीच प्लेआॅफसाठी पात्रता मिळविली आहे. १५ व्या षटकात तिसर्या चेंडूवर मुंबईला प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी दोन धावांची गरज असताना एक धाव निघाली, पण अंबाती रायडू धावबाद झाल्यामुळे रंगत निर्माण झाली. प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्सपुढे राजस्थान रॉयल्सने दिलेले १९० धावांचे लक्ष्य १४.३ षटकांत गाठण्याचे आव्हान होते. मुंबई इंडियन्सने १४.३ षटकांत ५ बाद १८९ धावांची मजल मारली होती. त्यावेळी नेटरनरेटमध्ये उभय संघ बरोबरीत होते. त्यामुळे प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी मुंबईपुढे त्यानंतरच्या चेंडूवर चौकार ठोकण्याचे लक्ष्य होते. आदित्य तरेने षटकार ठोकत मुंबईला प्लेआॅफमध्ये स्थान मिळवून दिले. या स्पर्धेत मारण्यात आलेल्या षटकांरापैकी हा आतापर्यंतचा सर्वाधिक ‘पैसा वसूल’ षटकार ठरला. राजस्थान रॉयल्सने (नेटरनरेट अधिक ०.०६०) संजू सॅम्सन (७४) व करुण नायर (५०) यांच्या कामगिरीच्या जोरावर ४ बाद १८९ धावांची मजल मारली होती. मुंबईने अधिक ०.०९५ नेटरनरेटच्या आधारावर प्लेआॅफसाठी पात्रता मिळविली. मुंबई इंडियन्सने विजयासाठी आवश्यक धावा १४.४ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. प्ले आॅफसाठी एका चेंडूत २ धावांची गरज असताना एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रायुडू धावबाद झाला. आपला संघ स्पर्धेबाहेर झाल्याचा समज होऊन तो मैदानावर गुडघे टेकवून बसला. उभय संघांच्या धावा आणि नेट रनरेट समान झाल्याने बाजी मारणारा संघ कोणता, यावर खेळाडू आणि पंचामध्ये बराच वेळ चर्चा रंगली. त्यानंतर पुढील चेंडूवर चौकार मारल्यास मुंबई प्ले आॅफ साठी पात्र ठरेल, असे समीकरण ठरले. ‘चिवट’ हे बिरूद लाभलेल्या मुंबईकर आदित्य तरेसाठी एवढी एक संधी पुरेशी ठरली. त्याचे फॉकनरचा लेग स्टंपवरील फुलटॉस स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर भिरकावून देताच वानखेडे स्टेडियमवर अभूतपूर्व जल्लोष झाला. त्याआधी, सलामीवीर संजू सॅम्सन (७४ धावा, ३६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) व करुण नायर (५० धावा, २६ चेंडू, ७ चौकार, २ षटकार) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित तिसर्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ४ बाद १८९ धावांची दमदार मजल मारली.
मुंबईची ‘प्ले-आॅफ’मध्ये मुसंडी
By admin | Updated: May 26, 2014 09:13 IST