मुंबई : नील जोशी आणि युवराज वाधवानी या मुंबईकरांनी चमकदार खेळ करताना कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर व सब - ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत मुलांच्या अनुक्रमे १३ व ११ वयोगटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी मुलींमध्ये नवमी शर्मा आणि अनन्या दाबके या मुंबईकरांना अनुक्रमे १५ व १३ वर्षांखालील गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताचा १३ वर्षांखालील अव्वल खेळाडू नीलने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना तामिळनाडूच्या कान्हव नानावटी याचा सरळ तीन गेममध्ये ११-४, ११-५, ११-३ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या बाजूला युवराजने देखील आक्रमक खेळ करताना उत्तराखंडच्या अंश त्रिपाठीचा ११-४, ११-५, १२-१० असा पराभव करुन विजेतेपदावर कब्जा केला.मुलींच्या गटात नवमीला सरळ तीन गेममध्ये हैदराबादच्या अमिता गोंदी विरुध्द पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिल्या गेममध्ये नवमीने अमिताला झुंजवले खरे, मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंचावून अमिताने पहिला गेम जिंकला. यानंतर तीने आणखी आक्रमक खेळ केल्याने नवमीचा निभाव लागला नाही आणि तीला १०-१२, ५-११, ४-११ असा पराभव स्वीकारावा लागला.मुलींच्या १३ वर्षांखालील गटाच्या पाच गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात अनन्याला दिल्लीच्या मेघा भाटीया विरुद्ध २-२ अशी बरोबरी साधल्यानंतरही फायदा प्राभूत व्हावे लागले. निर्णायक गेममध्ये मोक्याच्यावेळी चुका झाल्याने अनन्याला ९-११, ११-२, ६-११, ११-५, ७-११ असा पराभव पत्करावा लागला.
मुंबईकर नील व युवराजचे वर्चस्व
By admin | Updated: November 3, 2015 01:54 IST