चेन्नई : आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना सर्वच संघांना प्ले आॅफ गाठण्याची हुरहूर लागली आहे. माघारलेले संघ आता ओळीने विजय नोंदवीत आगेकूच करीत आहेत. सुरुवातीचे सामने गमाविणाऱ्या मुंबई इंडियन्सला शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध केवळ जिंकावेच लागणार नसून विजयासह धावसरासरीदेखील सुधारण्याचे आव्हान असेल. खराब सुरुवात केल्याने सलग पाच सामने गमाविणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्समध्ये अचानक उत्साहाचा संचार झाला. पुढचे पाच सामने जिंकून हा संघ पाचव्या स्थानावर पोहोचला. माजी विजेत्या मुंबईने मागचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पाच गड्यांनी जिंकला होता. पुढचे सर्व सामने जिंकून प्ले आॅफचा मार्ग मोकळा करण्याची या संघाची धडपड आहे.दोन वेळचा चॅम्पियन आणि दहापैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नईशी त्यांची आठ आहे. मुंबईसाठी चेन्नईला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याचे लक्ष्य तितकेसे सोपे नाही. पण मुंबईसाठी रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, अंबाती रायडू, लसिथ मलिंगा आणि हरभजन सिंग यांनी सातत्याने योगदान दिले ही दिलासादायक बाब आहे. (वृत्तसंस्था)
‘प्ले आॅफ’साठी मुंबई इंडियन्सची धडपड
By admin | Updated: May 8, 2015 01:31 IST