ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १६ - मुंबई इंडियन्सचं गुजरात लायन्ससमोर जिंकण्यासाठी 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरात लायन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरात लायन्सच्या गोलंदाजांनी निर्णय सार्थ ठरवत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाना एकामागोमाग एक तंबूत पाठवले. 77 धावांवर मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ गारद झाला होता. गेल्या सामन्यात चांगली खेळी करणा-या रोहीत शर्माने फक्त 7 धावा केल्या.
गुजरात लायन्सला कमी धावांत मुंबई इंडियन्सचा संघ गुंडाळण्याची संधी होती. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे 144 धावा झाल्या. टीम साऊथीने 11 चेंडूत 25 आणि कृणाल पांड्याने 11 चेंडूत 20 धावा करत संघाला सावरत 144 धावसंख्या उभी केली. गुजरात लायन्सकडून प्रविण तांबे आणि धवल कुलकर्णीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएलचा नवा संघ गुजरात लॉयन्सची एन्ट्री धडाक्यात झाली आहे. गुजरात लॉयन्सने सलग दोन विजय साजरे केले आहेत.
मुंबईला त्यांच्याच घरी नमवित विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या संधी त्यांच्याकडे आहे. गुजरात लायन्सने पहिल्या सामन्यात किंग्स पंजाबला पाच गड्यांनी आणि दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील पुणे सुपर जॉयन्टस्ला सात गड्यांनी पराभूत केले.
दुसरीकडे मुंबईने सलामीला पुण्याकडून नऊ गड्यांनी पराभवाचे तोंड पाहिले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर केकेआरला पराभूत करीत विजयाची कास धरली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला घरच्या मैदानावर विजय नोंदविण्याचे अवघड आव्हान असेल.