कराची : पाकचा दिग्गज फलंदाज मिस्बाह-उल हक आणि यूनिस खान यांना पाकिस्तान सुपर लीग टी-२० स्पर्धेसाठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत स्थान न मिळाल्याने दोघेही कमालीचे नाराज आहेत.पीसीबीने काल आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर केली. त्यात कसोटी संघाचा कर्णधार मिस्बाह आणि माजी कसोटी कर्णधार यूनिस यांना स्थान देण्यात आले नाही. दुसरीकडे जे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत त्या विदेशी खेळाडूंना आयकॉन बनविण्यात आले आहे. नाराज असलेले दोन्ही खेळाडू लीगबाहेर राहू शकतात, असे संकेत सूत्रांनी दिले. पीसीबीने टी-२० संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हफिज यालादेखील आयकॉन बनविलेले नाही. पाच फ्रॅन्चायसींचे आयकॉन खेळाडू म्हणून ख्रिस गेल, केविन पीटरसन, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक आणि शेन वॉटसन यांची निवड करण्यात आली आहे. गेल, वॉटसन आणि पीटरसन यांना झुकते माप देत आमच्याकडे डोळेझाक करण्यात आल्याबद्दल हे खेळाडू नाराज आहेत. (वृत्तसंस्था)
‘आॅयकॉन’मधून वगळल्याने मिस्बाह, यूनिस नाराज
By admin | Updated: December 18, 2015 03:08 IST