चेन्नई : वरिष्ठ संघात स्थान मिळवल्यानंतर संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेला दिल्लीचा फलंदाज उन्मुक्त चंद याच्यावर उद्यापासून (दि.५) सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेत अनेकांच्या नजरा असतील. भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व उन्मुक्त चंदकडे सोपविण्यात आले आहे. या मालिकेत शुक्रवारी भारताचा सामना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेची सुरुवात दक्षिण आफ्रिका ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील सामन्याने होईल. ही स्पर्धा २२ वर्षीय उन्मुक्त चंदसाठी मोठी परीक्षा असेल; कारण संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्याच्याकडे भविष्यातील एक मोठा फलंदाज म्हणून पाहत आहे. भारताला पुढील दोन वर्षांत जास्त क्रिकेट खेळायचे आहे. अशातच तिरंगी मालिकेत मनीष पांडे आणि केदार जाधव या खेळाडूंना झिम्बाब्वेतील प्रदर्शनाच्या जोरावर वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची संधी असेल. असे असले तरी सर्वांच्या नजरा कर्णधार उन्मुक्त चंद याच्यावर असतील. भारत ‘अ’ संघाची कमकुवत बाजू जलद गोलंदाजी आहे. ज्यात संदीप शर्मा, रुश कलरिया आणि रिषी धवन या मध्यमगती गोलंदाजांचा समावेश आहे. जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व धवल कुलकर्णीकडे असेल. ज्याचा सर्वाधिक वेग १३५ किमी प्रतितास आहे.
उन्मुक्त चंदवर असेल नजर
By admin | Updated: August 4, 2015 22:51 IST