बंगळुरू : किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध चार विकेटस् घेणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तेजतर्रार गोलंदाज श्रीनाथ अरविंदने सिनियर वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्याला बरेच काही शिकवले असल्याचे म्हटले आहे.ख्रिस गेलच्या ५७ चेंडूंत ११७ धावांच्या बळावर ३ बाद २२६ धावा केल्यानंतर बंगळुरूने अरविंद, स्टार्क यांनी घेतलेल्या प्रत्येकी ४ बळींच्या जोरावर १३८ धावांनी विजय मिळवला.अरविंद म्हणाला, ‘‘स्टार्कसोबत गोलंदाजी करणे सुखद होते. तो महान आॅस्ट्रेलियन गोलंदाज आहे. त्याने मला वेगवान गोलंदाजीविषयी बरेच काही शिकवले. यॉर्कर हे त्याचे प्रमुख अस्र आहे आणि मी ते त्याच्याकडून शिकलो.’’ अरविंदने रिद्धिमान साहा, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर आणि पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली यांना बाद केले. यापैकी सर्वात मौल्यवान विकेट कोणती असे अरविंदला छेडण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, मॅक्सवेल, बेली आणि मिलर या सर्वात मौल्यवान विकेटस् होत्या. हे तिघेही लक्ष्य गाठण्यात सक्षम होते. त्यामुळे त्यांच्या विकेटस् महत्त्वाच्या होत्या.अरविंदने या हंगामातील पहिल्याच लढतीत ४ बळी घेणे सुखद राहिल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘‘ही चांगली कामगिरी होती. गेल्या दोन वर्षांपासून आपण प्रतीक्षा करीत होतो. ’’ (वृत्तसंस्था)
स्टार्ककडून खूप काही शिकलो : श्रीनाथ अरविंद
By admin | Updated: May 8, 2015 01:32 IST