नवी दिल्ली : भारतीय डेव्हिस कप संघात राखीव खेळाडू असलेला दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने लियोन चॅलेंजर स्पर्धेत जेतेपद पटकावित एटीपीतर्फे सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या विश्व क्रमवारीत दुहेरीमध्ये आगेकूच केली, पण रोहन बोपन्नाची मात्र एका स्थानाने घसरण झाली. पेसने कॅनडाच्या आदिल शम्सदीनच्या साथीने मॅक्सिकोमध्ये जेतेपद पटकावले. त्याने दुहेरीच्या मानांकनामध्ये चार स्थानांची प्रगती करताना ५३ वे स्थान पटकावले. पेसच्या साथीने डेव्हिस कप संघातील अन्य राखीव खेळाडू बोपन्ना अद्याप भारताचा दुहेरीतील नंबर वन खेळाडू आहे. त्याची क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली असून तो २४ व्या स्थानी आहे. एकेरीमध्ये रामकुमार रामनाथन भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल आहे. त्याने दोन स्थानांची प्रगती करताना २६७ व्या स्थानी दाखल झाला आहे. युकी भांबरीने (२८५) आगेकूच करताना २२ स्थानांची प्रगती केली आहे. प्रजनेश गुणेश्वरनने ३८ स्थानांची प्रगती करताना ३०० मध्ये स्थान मिळवले आहे. तो २८७ व्या स्थानी आहे. महिलांच्या डब्ल्यूटीए दुहेरी मानांकनामध्ये सानिया मिर्झाने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. सानिया व स्ट्रायकोव्हाला मियामी ओपनच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
लिएंडर पेसची आगेकूच, रोहन बोपन्नाची घसरण
By admin | Updated: April 4, 2017 00:44 IST