ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - प्रो कबड्डीच्या दुसरे पर्व सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोव-यात सापडले असून प्रो कबड्डी लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश कऱण्यास शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. पाक खेळाडूंचे सामने महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराच शिवसेनेने आयोजकांना दिला आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये दुस-या पर्वात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून यातील एक खेळाडू बंगाल तर अन्य दोघे पाटण्याकडून खेळणार आहे. शिवसेनेने पाकिस्तानी कलाकार व खेळाडूंना नेहमीच विरोध दर्शवला असून प्रो कबड्डीत लीगमध्येही शिवसेनेने हीच भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रो कबड्डी लीगचे आयोजन करणा-या स्टार स्पोर्ट्सच्या कार्यालयाला निवेदन देत पाक खेळाडूंचा विरोध दर्शवला आहे. या खेळाडूंचे सामने मुंबई व महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.