रांची : सहाव्या स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबादला गुरुवारी आयपीएल-७ मध्ये आधीच प्ले आॅफमध्ये दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध दोन हात करायचे आहेत. हैदराबादसाठी ही अखेरची आशा आहे. चेन्नईने १२ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. सनरायजर्सचे १२ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण आहेत. हैदराबादचे २ सामने शिल्लक आहेत; पण उद्या विजय न मिळाल्यास हा संघ स्पर्धेबाहेर पडेल, हे नक्की! रांची येथे झालेल्या आधीच्या सामन्यात चेन्नईला बँगलोरकडून पराभवाचा फटका बसला होता. केकेआरनेदेखील त्यांचा पराभव केला आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या चेन्नईवर मानसिक दबाव आहेच. महत्त्वाच्या सामन्याआधी संघाला विजय हवा असल्याचे मत धोनीनेदेखील व्यक्त केले होते. आता घरच्या प्रेक्षकांपुढे विजयासाठी तो किती प्रयत्न करतो, हे उद्या दिसेलच. ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात कर्णधार डॅरेन सॅमी, फलंदाज शिखर धवन यांना मेहनत घ्यावी लागेल. हैदराबादने बँगलोरचा ७ गड्यांनी पराभव केला होता. या सामन्यात धवनने अर्धशतक ठोकले, तर डेव्हिड वॉर्नर, नमन ओझा, अॅरोन फिंच आणि सॅमी यांनी योगदान दिले होते. पण, हैदराबादची ताकद आहे ती गोलंदाजी. भुवनेश्वर कुमार, डेल स्टेन, वेणुगोपाल राव, इरफान पठाण, सॅमी आणि कर्ण शर्मा यांना चेन्नईच्या भक्कम फलंदाजीला खिंडार पाडावे लागणार आहे. चेन्नईसाठी हा सामना महत्त्वाचा नसला, तरी फायनलच्या तयारीसाठी त्यांनाही विजयी लय राखायची आहे. धोनी, रैना, मायकेल हसी, रवींद्र जडेजा, ड्वेन स्मिथ आणि फाफ डुप्लेसिस या सर्वांना यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजीत आश्विन, मोहित शर्मा, ईश्वर पांडे, रैना आणि बेन हिल्फेन्हास हे गोलंदाज संघाची ताकद आहे. ‘फ्लॉप शो’नंतर रांची मैदानावर चेन्नईला नव्या जोमाने उतरावे लागेल. (वृत्तसंस्था)
सनरायजर्ससाठी ‘अखेरची आशा’
By admin | Updated: May 22, 2014 05:26 IST