मुंबई : आगामी हिवाळी आॅलिम्पिकमध्ये उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांनी एकाच ध्वजाखाली संचलन करण्याचा घेतलेला निर्णय अद्भुत आहे. विशेष म्हणजे हे सर्व खेळामुळे झाले असून हीच खरी खेळांची ताकद आहे,’ अशी प्रतिक्रीया दिग्गज पोल वॉल्ट खेळातील माजी आॅलिम्पिक चॅम्पियन सर्जी बुबका याने व्यक्त केली.सर्जी बुबका यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा चेहरा असून यानिमित्ताने मुंबईत त्याने प्रसारमाध्यमांशी गुरुवारी संवाद साधला. त्यावेळी बुबकाने म्हटले की, ‘आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या (आयओसी) कार्यकारी बोर्ड बैठकीमध्ये मी स्वत:ही या मुद्यावर चर्चा केली होती. या निर्णयावर मी स्वत: खूप उत्साही असून मला वाटतं की या दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी ‘आयओसी’ अद्भुत कार्य करत आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होईल आणि दोन्ही देशांतील लोक एकमेकांच्या जवळ येतील.’त्याचप्रमाणे कोणत्याही खेळामध्ये धावणे हा एक पाया असल्याचे सांगताना बुबका म्हणाला की, ‘प्रत्येक खेळामध्ये तंदुरुस्तीला सर्वाधिक महत्त्व असते. पोल वॉल्टचा विचार केल्यास यामध्ये अॅथलेटिक्स आणि जिमनॅस्टिक्स या दोन्ही प्रकारांचा संगम असतो. यासाठी आम्ही लांब उडी, दिर्घ पल्ल्याची धाव आणि उंच उडी असा सराव करतो. त्यामुळे कोणत्याही खेळामध्ये तंदुरुस्त असणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी धावणे अनिवार्य असते.’
कोरियन देशांचा निर्णय खेळांची ताकद दर्शवतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 02:18 IST