कोलकाता : फलंदाजी आणि गोलंदाजीत जोरदार कामगिरी करीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला १३ धावांनी हरवून जोरदार आगेकूच केली. युसूफ पठाणच्या २४ चेंडूंतील तडाखेबंद ४२ धावा आणि पीयूष चावलाचे ३२ धावांत ४ बळी यांमुळे केकेआरला हा विजय साकारता आला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ७ बाद १७१ धावा केल्या आणि दिल्ली संघाला १५८ धावांत गुंडाळले.या विजयामुळे पदकतालिकेत केकेआरने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे; याउलट दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची स्पर्धेतील अवस्था अतिशय वाईट झाली असून पदकतालिकेत तो शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेतील त्याचे आव्हान पंजाबप्रमाणे संपल्यात जमा आहे.केकेआरच्या १७२ धावांचे आव्हान पेलताना दिल्लीची सुरुवात संथ झाली. विशेषत: मनोज तिवारीने २८ चेंडूंत २५ धावा केल्याने धावगतीचा दबाव वाढत गेला. पीयूष चावलाने आज खतरनाक गोलंदाजी करीत मनोज तिवारी (२८), जे. पी. ड्युमिनी (२५), केदार जाधव (१0) आणि युवराजसिंग (0) यांना बाद करून दिल्लीची किल्ली फिरवली. अँजेलो मॅथ्यूज (१५ चेंडूंत २२) आणि सौरभ तिवारी (१५ चेेंडूंत २४) यांचे शेवटच्या काही षटकांतील प्रयत्नही अपुरे पडले. दिल्लीचा डाव ६ बाद १५८ धावांवर थांबला.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा जोडीने केकेआरच्या डावाची सुरुवात केली. कर्णधार गंभीरकडून कोलकातावासीयांना फटकेबाजी अपेक्षा होती; परंतु तो केवळ १२ धावा करून बाद झाला. बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेड काढण्याची गंभीरची खोड माहीत असलेल्या झहीर खानने त्याला आउटस्विंगरच्या मोहात पाडले आणि यष्टिरक्षक केदार जाधवने गंभीरचा झेल घेतला.सुरुवातीच्या अपयशानंतर फॉर्मात आलेला रॉबिन उथप्पा (३२) सेट होतो आहे, असे वाटत असतानाच अमित मिश्राला स्वीप मारण्याच्या नादात पायचीत झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला मनीष पांडे आणि चौथ्या क्रमांकावर आलेला पीयूष चावला यांनी आज एकच आकडेवारी नोंदविली. दोघांनी १९ चेंडू खेळले आणि २२ धावा केल्या. विशेष म्हणजे, दोघांनाही एकेक चौकार-षटकार मारले.
दिल्ली डेव्हिल्सला हरवून केकेआर मजबूत स्थितीत
By admin | Updated: May 8, 2015 01:35 IST