मुंबई : सिद्धेश लाड (१०६) आणि निखिल पाटील (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान मुंबईने पहिल्या डावात कर्नाटकविरुद्ध सर्वबाद ४३६ अशी धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने पाहुण्या कर्नाटकने दुसऱ्या दिवस अखेर २ बाद १७५ अशी मजल मारत सामन्याचे पारडे समान स्थितीत आणले. मुंबईकडे अद्याप २६१ धावांची आघाडी आहे.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात समाधानकारक मजल मारली. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या यजमानांची सुरुवात निराशाजनक होती. ५ बाद १६७ अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईला सिद्धेश आणि निखिल यांनी १९० धावांची निर्णायक भागीदारी करून सावरले. कालच्या ५ बाद ३५७ या धावसंख्येवरून सुरुवात करताना या नाबाद जोडीने सावध खेळ केला. सिद्धेशने मोसमातील आपले पहिले शतक ठोकले. मात्र सहा धावांची भर टाकून तो लगेच बाद झाला. यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने १८ चेंडूंत १५ धावांची छोटेखानी खेळी केली. तर निखिलदेखील मोसमातील पहिले शतक झळकावल्यानंतर लगेच परतल्याने मुंबईचा डाव ८ बाद ४०४ असा घसरला. यानंतर अक्षय गिरप (२४) आणि हरमीत सिंग (१२) यांनी थोडाफार प्रतिकार केला. सिद्धेशने १३५ चेंडू खेळताना तब्बल २० चौकार खेचले. तर निखिलने १७२ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकार ठोकले. कर्णधार विनय कुमारने (४/८८) यशस्वी मारा करताना मुंबईला रोखले. तर उदीत पटेल आणि श्रीनाथ अरविंद यांनी अनुक्रमे ३ व २ गडी बाद केले.यानंतर मजबूत फलंदाजी असलेल्या कर्नाटकने पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करीत मुंबईला चोख उत्तर दिले. हुकमी गोलंदाज शार्दुल आणि संधू सपशेल अपयशी ठरल्याने यजमानांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अशावेळी हरमीतने रॉबीन उथप्पाला (४९) बाद करून पाहुण्यांना पहिला झटका दिला. या वेळी मुंबई पुनरागमन करेल असे दिसत होते. मात्र रवीकुमार समर्थ (नाबाद ८५) आणि कुणाल कपूर (३५) यांनी दुसऱ्या गडीसाठी ७३ धावांची भागीदारी करीत मुंबईला पळवले. दरम्यान, गिरपने ५५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कपूरचा त्रिफळा उडवत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर आलेल्या धडाकेबाज फलंदाज मनीष पांड्येने जम बसलेल्या समर्थसोबत दिवसअखेर टिकून राहताना यजमानांना दडपणाखाली आणले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : मांगेला झे. उथप्पा गो. विनय ४, तरे झे. समर्थ गो. गोपाळ ७२, अय्यर झे. गौतम गो. विनय २०, नायर झे. पांड्ये गो. पटेल ३६, यादव पायचीत गो. पटेल १९, लाड झे. गौतम गो. विनय १०६, पाटील झे. पांड्ये गो. अरविंद १०६, ठाकूर झे. उथप्पा गो. पटेल १५, गिरप झे. समर्थ गो. अरविंद २४, हरमीत झे. पायचीत गो. विनय १२, संधू नाबाद ९. अवांतर - १३. एकूण : ११७.१ षटकांत सर्वबाद ४३६ धावा.गोलंदाजी :विनय २३.१-६-८८-४; मिथुन २०-७-७४-०; गोपाळ १५-१-७३-१; अरविंद २७-३-९१-२; पटेल ३१-३-९६-३; समर्थ १-०-२-०.कर्नाटक (पहिला डाव) : उथप्पा पायचीत गो. हरमीत ४९, समर्थ खेळत आहे ८५, कपूर त्रि. गो. गिरप ३५, पांड्ये खेळत आहे ०. अवांतर - ६. एकूण ६० षटकांत २ बाद १७५ धावा.गोलंदाजी : ठाकूर ११-२-४५-०; संधू ७-३-८-०; हरमीत २३-३-६३-१; गिरप १८-०-५३-१; लाड १-०-४-०.
कर्नाटकचे मुंबईला चोख प्रत्युत्तर
By admin | Updated: February 8, 2015 02:00 IST