लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड अकारण्यात आला आहे. रवींद्र जडेजा आणि भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला शिवीगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप असून तो लेव्हल-३ (कलम २.३.३) अंतर्गत दोषी आढळल्यास दोन कसोटी किंवा चार वन डे सामन्यांसाठी निलंबित होऊ शकेल.ट्रेंटब्रिज येथे पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. गुरुवारी उपहाराला मैदानावरुन परत येत असताना जडेजाला अॅण्डरसनने शिवीगाळ केली तसेच धक्का दिला असा आरोप आहे. हे दोघेही तंबूत परत येईपर्यंत हा प्रकार सुरू होता. लेव्हल-३ अंतर्गत प्रकरण विधी आयोगाकडे सोपविले जाते. आयोगाला काही तथ्ये आढळल्यास दोषींना नंतर शिक्षा होते. लेव्हल -३ प्रकरणी दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर चार ते आठ गुणांचे निलंबन लावले जाते. दोन निलंबन गुण अर्थात एका कसोटी सामन्यांची किंवा दोन वन-डे ची बंदी असे सूत्र आहे. दोषी खेळाडू पुढे कुठल्या प्रकारचे सामने खेळणार आहे यावरही हे अवलंबून असते. (वृत्तसंस्था)
जडेजाला शिवीगाळ; अॅण्डरसनला दंड
By admin | Updated: July 16, 2014 02:32 IST