बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी येथे ख्रिस गेलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. जेव्हा हा कॅरेबियन फलंदाज फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याला रोखणे जगातील कोणत्याही गोलंदाजासाठी सोपे नसते, असे विराटने म्हटले.विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल लढतीत येथे किंग्स इलेव्हन पंजाबवर १३८ धावांनी मात केली. तो म्हणाला, ‘‘अव्वल तीन फलंदाजांनी योगदान दिले आणि त्यातल्या त्यात ख्रिस गेलची खेळी विशेष होती. त्यानंतर आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली.’’गेलने १२ षटकारांसह ११७ धावांचा पाऊस पाडला. त्या बळावर आरसीबीने ३ बाद २२६ धावांचा एव्हरेस्ट रचला होता. त्यानंतर आरसीबीने किंग्स इलेव्हनला १३.४ षटकांत ८८ धावांत गुंडाळले होते. कोहली म्हणाला, ‘‘गेल असाचा खेळत राहो. त्याला बंगळुरूमध्ये रोखणे अशक्य आहे आणि त्याने मोठी खेळी केल्याचा आनंद वाटतो. आमच्यासाठी त्याचे योगदान खूप मोठे आहे.’’तथापि, सामनावीर गेलने विजयाचे श्रेय हे पूर्ण संघाला दिले. तो म्हणाला, ‘‘हा पूर्ण संघाचा शानदार प्रयत्न होता. मी मिशेल जॉन्सनच्या षटकात काही लय मिळवली. मैदानावरील पुनरागमनाने मी खूप खूश आहे. आता स्पर्धेतील महत्त्वपूर्ण वळण आहे. प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे.’’किंग्स इलेव्हन संघाचा कर्णधार बेलीने गेलचा झेल सोडणे संघासाठी महागात ठरल्याचे म्हटले. तो म्हणाला, ‘‘आम्ही त्याला दोनदा जीवदान दिले. त्याची जबाबदारी आपण स्वत: घेतो. आम्हाला दोनदा संधी होती. आमचे खूप पाठीराखे होते आणि आम्ही त्यांना मान खाली घालायला लावली.’’गेलचा झेल सोडला तेव्हा डोक्यात कोणता विचार घोळत होता, असे पत्रकारांनी बेलीला छेडले. तेव्हा बेली म्हणाला, ‘‘मी विचार करीत होतो, बेवकूफ तू त्याचा झेल कसा सोडला.’’ (वृत्तसंस्था)
गेलला रोखणे सोपे नव्हते
By admin | Updated: May 8, 2015 01:30 IST