ऑनलाइन लोकमत -
हैदराबाद, दि. १६ - गौतम गंभीरच्या नाबाद 90 धावांच्या कॅप्टन खेळीच्या मदतीने कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैद्राबादवर 8 गडी राखत सहज विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 143 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कोलकाता नाइट रायडर्सने 18.2 ओव्हरमध्ये फक्त 2 गडी गमावत विजय मिळवला आहे. कोलकाता नाइट रायडर्सची सलामी जोडी कर्णधार गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने 92 धावांची पार्टनरशिप करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. रॉबिन उथप्पा 38 धावांवर बाद झाला. तर गौतम गंभीरने 60 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या.
हैदराबादला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आज कोलकाता नाइट रायडर्सला हरवून खातं खोलण्याची संधी त्यांच्याकडे होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पहिला सामना ४५ धावांनी गमावला होता. आणि आता दुस-या सामन्यातही कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांचा पराभव झाला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सने गेल्या सामन्यात मुंबईकडून झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी घोडदौड सुरु केली आहे. केकेआरने पहिल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ गड्यांनी धूळ चारली होती
.
सनरायझर्स हैद्राबादने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीलाच शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर स्वस्तात बाद झाले. इऑन मॉर्गनने सर्वात जास्त 51 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून उमेश यादवने 3 विकेट्स घेतल्या तर मॉर्ने मॉर्केलने 35 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या होत्या.