ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - आयपीएलच्या नवव्या पर्वातील सामन्यात गुजरात लॉयन्सने सलग तिसरा विजय साकारला आहे.
आजच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात गुजरात लॉयन्सने मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिऴविला.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना गुजरात लॉयन्सने फलंदाज फिंचच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर हा विजय खेचून आणला.फिंचने ५४ चेंडूत ६५ धावा केल्या.
सुरेश रैना २७ धावांवर झेलबाद झाला, तर ब्रॅन्डन म्यॅक्यूलम अवघ्या सहा धावा काढून तंबूत परतला. दिनेश कार्तिक (९), ड्वेन ब्राव्हो (२), अक्षदीप नाथ (१२) आणि जेम्स फॉल्कनर सात धावांवर झेलबाद झाला.
गुजरात लॉयन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सचं गुजरात लॉयन्ससमोर जिंकण्यासाठी १४४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. गुजरात लॉयन्सच्या गोलंदाजांनी निर्णय सार्थ ठरवत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाना एकामागोमाग एक तंबूत पाठवले. ७७ धावांवर मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ गारद झाला होता. गेल्या सामन्यात चांगली खेळी करणा-या रोहीत शर्माने फक्त ७ धावा केल्या.