ऑनलाइन लोकमत
बर्निंगहॅम, दि. २ - भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे ९ विकेट गेले असून इंग्लंडच्या संघाने २०६ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर फारकाळ टिकावधरता आला नाही. भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी याने २८ धावा देत गॅरी बॅलेन्स, जोस बटलर व हॅरी गर्नि यांना बाद केले. तर अॅलिस्टर कुकच्या जेमतेम नऊ धावा झाल्या असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाकडे झेल गेल्याने त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. तसेच रविंद्र जडेजांने ४० धावा देत इयान मुरगन व स्टिव्हन फिनला बाद केले. मोईन अलीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या संघातील महत्वाच्या फलंदाजांना अर्धशतकही करता आले नाही. मोईन अलीने ६७ धावा केल्या तर जो रुट अर्धशतकाच्या जवळ असतानाच धवल कुलकर्णिकडे झेल गेल्याने तो बाद झाला. सोशल नेटवर्कसाइट्सवर भरतीय संघ कसोटी सामन्याचा बदला घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतू अजून भारताची खेळी बाकी असून आणखी एक सामना होणार आहे. तेव्हा या एक दिवसीय मालिकेतील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.