बॅकॉक : संगीता कुमारीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने १८ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. या निर्णायक सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाचा ३-० असा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. कांस्यपदकासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात संगीताने ५५व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर याआधी अनुभवी रितूने ४५व्या मिनिटाला पहिला गोल करून भारताचे खाते उघडले होते. दोन्ही संघांनी बचावात्मक सुरुवात करताना पहिल्या सत्रात आपल्या आक्रमणाला मुरड घातली. यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर भारतीय महिलांनी दुसऱ्या सत्रात वेगवान खेळ करत वर्चस्व राखले. रितूने मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना जबरदस्त गोल करून भारताला आघाडीवर नेले, तर यानंतर भारताला थेट पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. परंतु, मनप्रीत कौरने मारलेला फटका कोरियाची गोलरक्षक ली डा बोम हिने यशस्वीपणे रोखला. तरीही सामन्यावर भारताचे वर्चस्व होते. यानंतर सुरू झाला तो, संगीताचा धडाका. ५५व्या मिनिटाला लालरेमसियामीने दिलेला पास अचूकपणे आपल्याकडे घेताना संगीताने दोन बचावपटूंना चकमा देत अप्रतिम गोल करून भारताची आघाडी २-० अशी केली. यानंतर याच गोलची पुनरावृत्ती करताना संगीताने भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राखत भारतीय महिलांनी कांस्यपदक निश्चित केले. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला संघाने जिंकले कांस्य
By admin | Updated: December 23, 2016 01:29 IST