कोपेनहेगन : दोन सेटची महत्त्वपूर्ण आघाडी असतानाही भारतीय महिला तिरंदाजी संघाला रिकर्व्ह गटात रशियाकडून शूटआॅफमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी मांझी आणि रिमिल बुरुली या त्रिकुटाने रशियन संघावर दबाव निर्माण करीत ४-0ची आघाडी मिळविली होती, परंतु भारतीय संघाने पुढील दोन सेट गमावले आणि नंतर शूट आॅफमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला.भारताने या स्पर्धेत दुसरे रौप्य जिंकले आहे. यापूर्वी काल कंपाउंड प्रकारात रजत चौहानने वैयक्तिक रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. विश्व तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये ही भारताची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे. महिला गटात आॅलिम्पिक कोटा मिळविल्यानंतर भारतीय संघाने खेळाडूंच्या स्थानांमध्ये बदल केला. अव्वल खेळाडू दीपिकाकुमारी पहिल्या आणि अंतिम प्रयत्नासाठी मैदानात उतरली. रशियन संघाने धिमी सुरुवात करुनही पदक जिंकण्यात यशस्वी ठरली.४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर शूट आॅफमध्ये तुयाना दाशिदोरझीवा हिने परफेक्ट १0 गुणांसह सुरवात केली. भारताकडून लक्ष्मीरानीनी याची बरोबरी केली. दुसऱ्या फेरीत पेरोवाने ९ गुण मिळविले, तर भारताच्या रिमिलचा बाण ८ गुणांवर लागला. स्टेपानोवाने ९ गुण मिळवित भारतावर दबाब वाढविला, शेवटच्या प्रयत्नात दीपिकाला परफेक्ट १0 गुण मिळवून विजय मिळवण्याचा दबाव होता, परंतु तिला केवळ ९ गुणांवर समाधान मानावे लागल्यामुळे भारताला रौप्यपदक मिळाले.(वृत्तसंस्था)
भारतीय महिला संघाला रौप्यपदक
By admin | Updated: August 2, 2015 23:42 IST