पर्थ : भारतीय ज्युनिअर हॉकी संघ आॅस्ट्रेलियन हॉकी लीग (एएचएल) स्पर्धेत कांस्यपदकापासून वंचित राहिला. एनएसडब्ल्यू वारथाज संघाने भारतीय ज्युनिअर हॉकी संघावर ५-१ गोलने पराभव केला.कांस्यपदकासाठी झालेल्या या लढतीत भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक ठरली. वारथाज संघाने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्रा अवलंबताना सहाव्या मिनिटालाच पहिला गोल करीत आपले खाते उघडले. त्यानंतर या संघाने १६ व २३व्या मिनिटाला आणखी दोन गोल करीत आघाडी ३-0 अशी वाढवली. मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय संघाला एकमेव यश गुरजन्तसिंग याने २५व्या मिनिटाला गोल करून संघाची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये मोर्लेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला ४-१ अशा भक्कम स्थितीत नेले. तर, अंतिम क्वार्टरच्या अखेरच्या क्षणी क्रेगने आपला दुसरा वैयक्तिक गोल करताना भारतीय संघाच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी फेरले.प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, ‘आम्हाला या वर्षाअखेरीस ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे आणि ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ होते. या स्पर्धेतून खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव मिळाला. आपल्या चुकांतून शिकताना निश्चितच भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये जोरदार मुसंडी मारील.’ (वृत्तसंस्था)
भारतीय ज्युनिअर संघ कांस्यपदकापासून वंचित
By admin | Updated: October 10, 2016 04:25 IST