कोलकाता : सलामीवीर आणि यष्टिरक्षक रिषभ पंत याच्या ८७ धावांची स्फोटक गोलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या बळावर भारताने अफगाणिस्तानला शनिवारी ३३ धावांनी पराभूत करीत अंडर १९ क्रिकेट तिरंगी वनडे मालिकेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ५0 षटकांत २३६ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी संघाला ४७.३ षटकांत २0३ धावांत गारद केले. भारताकडून रिषभ पंत याने अवघ्या ८८ चेंडूंत ८७ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्यात १0 चौकार व २ षट्कारांचा समावेश आहे.प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी सलामीवीर वॉशिंग्टन सुंदर याला धावफलकावर ५ धावा असतानाच गमावले; परंतु पंतने त्यानंतर काही उपयुक्त भागीदाऱ्या करताना भारताच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने अमनदीप खरे (२४) याच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी ६२ आणि कर्णधार रिकी भुई (२७) याच्या साथीने ७५ धावांची भागीदारी केली. खरे याने ३0 चेंडूंत २ चौकार, एक षटकार मारला तर भुई याने ४७ चेंडूंत ३ चौकार मारले.पंतने संघाची धावसंख्या १४९ असताना चौथ्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला; परंतु महिपाल लोमरोर याने ६२ चेंडूंत ६ चौकारांसह ४३ व अनमोलप्रीतसिंह (१६) यांनी भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. अफगाणिस्तानच्या राशीद खानने ४७ धावात ४ गडी बाद केल..लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली आणि त्यांच्या सलामीवीरांनी ४५ धावांची भागीदारी केली; परंतु इजहान सय्यदने याच धावसंख्येवर अफगाणिस्तानला दोन धक्के दिले. त्यानंतर त्यांचा डाव ढेपाळत गेला. अफगाणिस्तानची बिनबाद ४५ वरून ५ बाद ६५ अशी स्थिती झाली. एकवेळ अफगाणिस्तानची ३२ व्या षटकांत ७ बाद ११३ अशी स्थिती झाली होती; परंतु राशीद खान याने ३९ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ आणि मोहंमद सरदार याने ५0 चेंडूंत ३३ धावा काढताना भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. अशा स्थितीत डावखुरा मध्यमगती गोलंदाज खलील अहमदने राशीद आणि मोहंमद यांना बाद करीत विजयी मार्ग सुकर केला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : भारत ५0 षटकांत सर्वबाद २३६. (रिषभ पंत ८७, लोमरोर ४३, भुई २७, खरे २४. राशीद खान ४/४७, एम. मुसा २/३२).अफगाणिस्तान : ४७.३ षटकांत सर्वबाद २0३.(राशीद खान ४३, मोहंमद सरदार ३३. खलील अहमद ४/४१, पी. प्रामाणिक २/३४, लोमरोर २/३१).
रिषभ पंतच्या स्फोटक फलंदाजीने जिंकला भारत
By admin | Updated: November 22, 2015 04:03 IST