ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १६ - भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाने श्रीलंकेला तारले असून लंकेने भारतासमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मॅथ्यूजच्या नाबाद १३९ धावा आणि लाहिरु तिरिमानेच्या ५२ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने ५० षटकात आठ गडी गमावत २८६ धावांची समाधानकारक धावसंख्या गाठली.
रांचीतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र या सामन्यातही श्रीलंकेचे सलामीवीर अपयशी ठरले. निरोशन डिकोवाला आणि तिलकरत्ने दिलशान हे सलामीवीर अवघ्या ४५ धावांमध्येच तंबूत परतले. त्यापाठोपाठ चांदीमल आणि जयवर्धने हे दोघेही स्वस्तात माघारी परतल्यामुळे श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि थिरिमाने या जोडीने संयमी खेळी करत लंकेची वाताहत रोखली. या जोडीने १२८ धावांची भागीदारी केली. अखेर ५२ धावांवर असताना थिरिमानेला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षीत साथ मिळत नसतानाही मॅथ्यूजने जोरदार फटकेबाजी करत शतकही झळकावले व संघालाही सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मॅथ्यूजने ११६ चेंडूमध्ये १३९ धावा केल्या. विशेष म्हणजे १३७ सामन्यानंतर मॅथ्यूजने एकदिवसीय सामन्यात आपले पहिले वहिले शतक ठोकले. अजंता मेंडिस, सीकुगे प्रसन्ना हे फलंदाज भोपळा न फोडताच बाद झाले. भारतातर्फे धवल कुलकर्णीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. स्टुअर्ट बिन्नीला फक्त एकच विकेट घेता आली. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत ४- ० ने आघाडीवर असून पाचवा सामना जिंकून लंकेला क्लीन स्वीप देण्यास भारतीय संघ प्रयत्नशील आहे.