बर्मिंघम : चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली. तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरी सामन्यात बांगलादेशने ७ बाद २६४ धावा केल्या. भुवनेश्वर कमार याने सुरुवातीला दोन गडी बाद करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र तमीम इक्बाल ७० आणि मुशीफिकूर ६१ यांनी १२३ धावांची दमदार भागीदारी केली. या दोघांच्या खेळाने बांगलादेश ३०० चा आकडा पार करेल, असे वाटत होते. मात्र केदार जाधव याने २५ धावांत या दोघांना बाद केले. तसेच जडेजाने शकीब अल हसनला बाद केले. कर्णधार मश्रफी मोर्तुझा याने २५ चेंडूत ३० धावा केल्या. जाधव भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सहा षटकांत २२ धावा देत तमीम आणि मुशीफिकूर यांना बाद केले. जसप्रीत बुमराह याने १० षटकांत ३९ धावा देत दोन तर भुवनेश्वरने ५३ धावा देत २ गडी बाद केले. जडेजा याने १ गडी बाद केला. त्यासोबतच तो भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. बांगलादेशच्या तमीम इक्बाल याने ६२ चेंडूत रवींद्र जडेजाचा चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. तमीमने ८२ चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ७० धावांची खेळी केली. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या तमीम याने हार्दिक पांड्याला षटकार लगावत आपला धावांचा वेग वाढवला. नंतर आश्विनला सलग तीन चौकार लगावत त्याने भारतीय कर्णधाराला विचार करण्यास भाग पाडले. मात्र केदार जाधवच्या चेंडूवर तो चकला. (वृत्तसंस्था)तर मुशीफिकूर रहीम यानेदेखील ८५ चेंडूत ६१ धावा केल्या. डेथ ओव्हर्समध्ये बुमराह याने मोसादेक हुसेन आणि महमुदुल्लाह यांना बाद करत बांगलादेशवर दबाव वाढवला. मात्र मश्रफी आणि तस्कीन अहमद यांनी आठव्या गड्यासाठी नाबाद ३५ धावांची उपयुक्त भागीदारी केली. धवन-रोहितची विक्रमी भागीदारी- चॅम्पियन्स ट्रॉफीत आतापर्यंत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ९ डावात ७६६ धावांची भागीदारी केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक भागीदारी आहे. त्यांनी चार शतकी आणि ३ अर्धशतकी भारीदाऱ्या केल्या आहेत. त्यांच्या मागे वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल -ख्रिस गेल यांची जोडी आहे. त्यांनी ६३५ धावा केल्या. पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफ आणि शोएब मलिक यांनी ५ डावांत ४१४ धावांच्या भागीदाऱ्या केल्या आहेत. भारताच्या सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी ७ डावात ४१२ धावा केल्या आहेत. त्यात एक शतकी भागीदारी आणि तीन अर्धशतकी भागीदाऱ्या आहेत.तर राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी ५ डावांत ३७४ धावांची भागीदारी केली. त्यांनी एक शतकी आणि तीन अर्धशतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. धावांचे शिखरशिखर धवन याने बांगलादेशविरोधात ४६ धावांची खेळी केली. त्यासोबतच त्याने भारताकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करण्याच्या सौरव गांगुलीच्या विक्रमाला मागे टाकले. गांगुली याने ११ डावात ६६५ धावा केल्या होत्या. तर धवन याने ९ डावातच ६८३ धावा केल्या. आता त्याच्या पुढे ख्रिस गेल ७९१, महेला जयवर्धने ७४२, संघकारा ६८३ हे आहेत. धावफलक...बांगलादेश : तमीम इक्बाल गो. केदार जाधव ७०, सौम्य सरकार गो. भुवनेश्वर कुमार ०, शब्बीर रहमान झे. जडेजा गो. कुमार १९,मुशीफिकूर रहिम झे. कोहली गो. जाधव ६१, शकीब अल हसन झे धोनी गो. जडेजा १५, महमुदुल्लाह गो. बुमराह २१, मोसेदेक हुसेन झे. गो. बुमराह १५, मश्रफी मोर्र्तुझा नाबाद ३०, तस्कीन अहमद नाबाद १०.गोलंदाजी - भुवनेश्वर कुमार १०-१-५३-२, जसप्रीत बुमराह १०-१-३९-२, आर. आश्विन १०-०-५४-०, हार्दिक पांड्या ४-०-३४-० , रवींद्र जडेजा १०-०-४८-१, केदार जाधव ६-०-२२-२.बाद क्रम - १-१, २-३१, ३-१५४, ४-१७७, ५-१७९, ६-२१८, ७-२२९
भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
By admin | Updated: June 16, 2017 04:12 IST