नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी प्रस्तावित भारत - पाकिस्तान द्विपक्षीय मालिका लवकरात लवकर सुरु होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात केली. त्याचबरोबर सोमवारी शिवसेनेने मुंबईतील बीसीसीआय कार्यालयावर केलेल्या आक्रमक आंदोलनाचा निषेधही केला.भारत - पाक मालिकेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान सध्या भारतात आहेत. परंतु, ठाकूर यांनी सर्वप्रथम चर्चेला योग्य असे वातावरण निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतरच प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेबाबत चर्चा होऊ शकते असे सांगत ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर ठाकूर यांनी सांगितले की, सर्वप्रथम या आक्रमक आंदोलनाचा आम्ही निषेध करतो. कोणीही बीसीसीसी परिसरामध्ये जबरदस्ती प्रवेश करु शकत नाही. तसेच पीसीबी अध्यक्षांसह चर्चा न करण्याबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणू शकत नाही. माझ्या मते पीसीबीसह याबाबतीत चर्चा करण्यास बीसीसीआय सक्षम असून अंतिम निर्णय हा केंद्र सरकारशी बातचीत झाल्यानंतरच घेतला जाईल. तसेच लोकशाहीमध्ये तुम्ही विरोध करु शकता. मात्र कोणाच्याही घरी, कार्यालयात किंवा मुख्यालयात जबरदस्ती प्रवेश करु शकत नाही. हे योग्य नाही, असेही ठाकूर म्हणाले. बांगलादेशचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेबाबत ठाकूर म्हणाले की, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेच्या आयोजनाविषयी आम्ही कधीही चर्चा केली नाही. (वृत्तसंस्था)अलीम दार यांना धमकी ..दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानी पंच अलीम दार यांनी पंचगिरी न करण्याची धमकी शिवसेनेने दिली आहे. जर या सामन्यासाठी दार मुंबईत आल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही त्यांना सुनावण्यात आले आहे. आफ्रिकेविरुद्धचा चौथा सामना चेन्नईत, तर पाचवा सामना मुंबईत होणार आहे. शिवसेनेने १९९९ साली दिल्लीत आयोजित भारत-पाक कसोटी सामन्यावरुन तोडफोड केली होती.त्यामुळे हा सामना चेन्नईला घेण्यात आला होता. तसेच २०१२ साली देखील शिवसेनेने पाकिस्तानी खेळाडूंना भारतात आमंत्रित करण्यास विरोध दर्शविला होता. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे पाचव्या एकदिवसीय सामना मुंईतून इतरत्र हलविला जाण्याची दाट शक्यता आहे.दुबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीमध्ये सेठी आणि ठाकूर यांच्यातही या प्रस्तावित मालिकेबाबत चर्चा झालेली. यावेळी ठाकूर यांनीच पीसीबी अध्यक्षांना बीसीसीआय अध्यक्षांच्या वतीने भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते. मागील दिड वर्षांपासून दोन्ही देशांतील संबंधामध्ये तणाव वाढल्याने या प्रस्तावित मालिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील कित्येक दिवसांपासून ही प्रस्तावित मालिका व्हावी यासाठी पीसीबी बीसीसीआयचे मन वळवण्याच्या प्रयत्ना आहे. मात्र काही दिवसांपुर्वीच बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी आतंकवाद व क्रिकेट एकत्रित होऊ शकत नसल्याचे सांगत मालिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच दुसऱ्यांदा बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशांक मनोहर यांनी पीसीबीला या मालिकेसंदर्भात बैठकीचे आमंत्रण देत आशा जागवली. मात्र शिवसेनेच्या या आक्रमक आंदोलनामुळे पुन्हा एकदा या मालिकेबाबत संभ्रम निर्माण झाले आहे.बीसीसीआय व पीसीबी यांच्यातील चर्चा थांबविण्यात आलेली नाही. मनोहर आणि शहरयार यांच्यात मंगळवारी दिल्ली येथे पुन्हा एकदा दुसरी चर्चा होईल. कोणत्याही परिस्थितीत ही चर्चा थांबणार नाही. बीसीसीआय कधीही राष्ट्रहिताविरोधात तडजोड करणार नाही. परंतु, चर्चा थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थनही करणार नाही. क्रिकेटसंबधी निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयकडेच असावे. - राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष
भारत - पाक मालिका लवकर होणार नाही!
By admin | Updated: October 20, 2015 02:46 IST