नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले. भारतीय लोकप्रतिनिधी पाकिस्तानचा दौराही करून आले. तसेच, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताचा दौराही केला. मात्र, तरीही ही मालिका अजून दृष्टिक्षेपात आलेली नाही.भारत आणि पाकिस्तानदरम्यान डिसेंबरमध्ये मालिका आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने जोर लावला होता. मात्र, भारत सरकारने या मालिकेला परवानगी दिली नाही. ‘पीसीबी’चे अध्यक्ष शहरयार खान यांनी या मालिकेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, यात त्यांना यश आले नाही. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हे दोन्ही देश एकाच गटात असणार आहेत, हे विशेष.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) च्या आगामी कार्यक्रमांतर्गत भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक समझोता झाला होता. यानुसार दोन्ही देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या काळात सहा क्रिकेट मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. याची सुरुवात डिसेंबर २०१५ मध्ये होणार होती व पाकिस्तान याचे आयोजन करणार होते. ‘आयसीसी’च्या कार्यक्रमांतर्गत भारत या मालिकेसाठी तयार होईल, असे पीसीबीला वाटत होते. मात्र, दहशतवादी कृत्यांमुळे बीसीसीआयने नकार दिला. दरम्यान, खूप प्रयत्नांनंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांचे अध्यक्ष दुबईमध्ये भेटले. या भेटीत १५ डिसेंबरदरम्यान श्रीलंका किंवा बांगलादेशमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यावर सहमतीही झाली. या मालिकेचे नियोजन करण्यासाठी शहरयार भारतात आले होते. मात्र, शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे त्यांना परत जावे लागले. यानंतरही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर या मालिकेला मंजुरी मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, भारत सरकारने याबाबत मौनच पाळणे पसंत केले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली, तरीही या मालिकेच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत.या वर्षीच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. मात्र, या दोन देशांदरम्यानची मालिका सध्या तरी ‘स्वप्न’च बनली आहे. (वृत्तसंस्था)भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर व पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंना या दोन देशांदरम्यान मालिका व्हावी, असे वाटते. दोन्ही देशांतील नेते भेटू शकतात, तर क्रिकेट मालिका का होऊ नये, असे सांगण्यात आले.‘बंदुकीच्या गोळीबरोबर चेंडू टाकला जाऊ शकत नाही,’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
भारत-पाक मालिका ‘स्वप्नच’
By admin | Updated: December 31, 2015 01:48 IST