नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आमिर सोहेलला १९९६च्या विश्वकप स्पर्धेत ‘क्लीन बोल्ड’ केल्यामुळे चर्चेत आलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादच्या मते, भारतीय संघाने विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल, असेही प्रसाद म्हणाला. भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक ठरली असली, तरी व्यंकटेशने मात्र त्याला महत्त्व दिले नाही. व्यंकटेश म्हणाला, ‘परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना असणे भारतासाठी चांगली बाब आहे. भारताने विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध नेहमीच विजय मिळवला आहे. भारत या कामगिरीत सातत्य राखत स्पर्धेत विजयी सुरुवात करू शकतो.’व्यंकटेशने पाकिस्तान संघ उलटफेर करण्यास सक्षम असल्याचे सांगताना भारतीय संघाला इशारा दिला आहे. त्यामुळे भारताने पाक संघाला कमी लेखणे चुकीचे आहे, असेही व्यंकटेश म्हणाला. (वृत्तसंस्था)
भारताला विजय आवश्यक : व्यंकटेश
By admin | Updated: February 10, 2015 02:02 IST