भुवनेश्वर : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला आज, रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला काल, शनिवारी उपांत्य फेरीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ३-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने या धक्क्यातून सावरताना तिसऱ्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या लढतीत चांगली कामगिरी केली; पण ५२ व्या मिनिटाला स्वीकारावा लागलेल्या गोलमुळे त्यांचे तिसरे स्थान पटकाविण्याचे स्वप्न भंगले. भारताला या स्पर्धेत पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २०१२ मध्ये मेलबोर्नमध्ये खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या स्पर्धेत पाकविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे चौथ्या स्थानावर होता. अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेला १३ वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाला यावेळी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाने यापूर्वी सलग पाचवेळा या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत आॅस्ट्रेलियातर्फे १८ व्या मिनिटाला अॅडी ओकेनडेनने मैदानी गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारताला बरोबरी साधण्यासाठी ४२ व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ललित उपाध्यायने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला मॅट गोड््सने मैदानी गोल नोंदवीत आॅस्ट्रेलियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी जोरकस प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. भारतीय संघ यापूर्वी २०१२, २००४, २००३, २००२, १९९६ व १९८३ मध्ये चौथ्या स्थानावर होता. भारताने १९८२ मध्ये केवळ एकदा तिसरे स्थान पटकाविले होते. (वृत्तसंस्था)
भारत चौथ्या स्थानी
By admin | Updated: December 15, 2014 00:01 IST