ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. १४ - सुरेश रैना (नाबाद ११०) आणि कर्णधार धोनी (नाबाद ८५) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेवर ६ गडी राखून विजय मिळवला. झिम्बाब्वेने दिलेले २८८ धावांचे आव्हान भारताने ४८.४ षटकांतच पूर्ण केले.
रोहित शर्मा(१६), शिखर धवन(४), विराट कोहली (३८), अजिंक्य रहाणे(१९) हे भरवशाचे फलंदाज पटापट तंबूत परतल्यानंतर रैना व धोनीने तूफान खेळी कपत विजय अक्षरश: खेचून आणला.
रोहित शर्मा व शिखर धवनने भारताला सुरूवात तर चांगली करून दिली, मात्र ६व्या षटकांत ते दोघेही एकापाठोपाठ बाद झाल्याने भारताला दोन मोठे धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीस आलेला अजिंक्य रहाणेही अवघ्या १९ धावा काढून बाद तंबूत परतला. ३८ धावांची खेळी करणारा विराट कोहली तरी भारताला सावरेल आणि विजयाच्या समीप नेईल असे वाटत होते, मात्र सिकंदर रझाच्या गोलदांजीवर तोही बाद झाला आणि भारताने महत्वाचे चार गडी गमावले. त्यानंतर रैनाने धोनीच्या साथीने सावधपणे खेळून भारताला विजय मिळवून दिला. झिम्बाब्वेच्या पनयानगराने २ तर सिंकदर रझाने १ बळी टिपला.
तत्पूर्वी ब्रँडन टेलरच्या १३८ धावांच्या शानदार खेळीमुळे झिम्बाब्वेने भारतासमोर जिंकण्यासाठी २८८ धावांचे आव्हान ठेवले. नाणफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. झिम्बाब्वेची सुरूवात संथ झाली आणि त्यांचे सलामीचे फलंदाज पटापट तंबूत परतले. मात्र त्यानंतर ब्रँडन टेलरने भारतीय गोलंदाजी चोपून काढत १३८ धावा केल्या आणि झिम्बाब्वेने पावणेतीनशे धावांचा टप्पा पार केला.
भारतातर्फे मोहम्मद शमी, मोहित शर्मा व उमेश यादवने प्रत्येकी ३ तर आर. अश्विनने १ बळी टिपला.