इपोह : रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने शनिवारी न्यूझीलंडचा ४-० ने पराभव केला आणि २६ व्या सुल्तान अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवला. रुपिंदरने १७ व २७ व्या मिनिटाला ड्रॅग फ्लिकवर न्यूझीलंडचा गोलकीपर रिचर्ड जोयसेला गुंगारा देत गोल नोंदवले.त्यानंतर एस. व्ही. सुनीलने ४८ व्या मिनिटाला या स्पर्धेतील वैयक्तिक पहिला गोल नोंदवला. त्याने मनदीप सिंगने दिलेल्या क्रॉसचा लाभ घेत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला, तर तलविंदर सिंगने अखेरच्या मिनिटाला भारतातर्फे चौथा गोल नोंदवला. त्याआधी, मलेशियाने प्लेआॅफमध्ये जपानचा ३-१ ने पराभव करीत स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. गेल्या वर्षी भारताने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर आॅस्ट्रेलियाने सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. भारताला शुक्रवारी साखळीतील अखेरच्या लढतीत मलेशियाविरुद्ध लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण आज मात्र भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. (वृत्तसंस्था)
भारताला कांस्य, न्यूझीलंडवर मात
By admin | Updated: May 7, 2017 00:37 IST