कोलकाता : राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारताच्या ज्युनिअर (अंडर-१९) क्रिकेट संघाला आज, रविवारी तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताच्या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखालील २० सदस्यीय संघाने डबल राऊंड रॉबिन टप्प्यात अफगाणिस्तान व बांगलादेश संघाचा पराभव केलेला आहे. २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. द्रविडने चार सामन्यांमध्ये अंतिम ११ खेळाडूंची निवड करताना रोटेशन पद्धतीचा योग्य वापर करीत सर्वांना संधी दिली आहे. भारताने चार सामने जिंकताना दोन बोनस गुणांचीही कमाई केली आहे.आंध्र प्रदेशच्या रिकी भुईने पहिल्या दोन लढतीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली, तर त्यानंतरच्या दोन सामन्यांत झारखंडच्या विराट सिंगने ही भूमिका बजावली. प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना त्यांना कुठली अडचण भासली नाही. भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त दिल्लीचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने तीन सामन्यांत ११८, ५१ आणि ८७ धावांची खेळी केली आहे. मधल्या फळीची जबाबदारी वाशिंग्टन सुंदर, विराट आणि भुई हे सांभाळतील. गोलंदाजीमध्ये भारतीय संघात इंदूरचा वेगवान गोलंदाज अवेश खान आहे. (वृत्तसंस्था)
भारत-बांगलादेश अंतिम लढत आज
By admin | Updated: November 29, 2015 01:30 IST