नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दोन कांस्यपदकांच्या यादीत आॅलिम्पिक पदकाचा समावेश करण्यास सज्ज असलेल्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रियोमधील परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार कोर्टवरील रणनीतीत बदल करणे यशाचे सूत्र असल्याचे म्हटले आहे.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये २0१३ आणि २0१५ असे सलग दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी सिंधू म्हणाली, की रियोमध्ये कशी परिस्थिती असेल याची आम्हाला कल्पना नाही, म्हणून आम्ही तेथे लवकर जात आहोत. तेथे आम्ही एक आठवडा सराव करुन कोर्टची सवय करुन घेणार आहोत. त्यामुळे रियोमधील हा आठवडा महत्त्वपूर्ण असेल. महिला एकेरीतील स्पर्धेबद्दल बोलताना २१ वर्षीय सिंधू म्हणाली, की या गटात कोणीही पदकाची दावेदारी करु शकत नाही. सगळेच तुल्यबळ आहेत. कोणीही कोणाला हरवू शकतो.हे सगळं ज्या त्या दिवसाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मी यापूर्वी हरवले असल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. परंतु एकमेकांविरुद्ध सातत्याने खेळल्याने विरोधी खेळाडू आपल्या फटक्यांबद्दल जाणून घेतो, त्यामुळे चुरस आणखीनच तीव्र होते. या सगळ्यावर मात करण्यासाठी कोर्टवर रणनीती बदलणे महत्त्चाचे ठरते. राष्ट्रकुल चॅम्पियन सिंधूला कॅनडाच्या मिशेल ली आणि हंगेरीच्या लौरा सरोई या दोघींसोबत एम गटात स्थान मिळाले आहे. साखळी फेरी तिने यशस्वीपणे पार केली तर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी चिनी तैपईच्या ताइ जु यिंग आणि चीनच्या यिहान वांग या दोन दिग्गज खेळाडूंशी लढावे लागेल.
परिस्थितीशी जुळवून घेणे महत्त्वाचे : पी. व्ही. सिंधू
By admin | Updated: August 1, 2016 05:42 IST