पर्थ : शतक ठोकूनही संघाला विजय मिळत नसेल, तर सर्वोत्कृष्ट खेळीलाही अर्थ नसतो, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले आहे. मागच्या तीन शतकांनंतरही भारतीय संघाला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. काल आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डेत रोहितने नाबाद १७१ धावा ठोकल्यानंतरही यजमानांनी सामना पाच गड्यांंनी सहजरीत्या जिंकला होता.रोहित म्हणाला, ‘‘मालिकेची सुरुवात सकारात्मक होणे महत्त्वाचे असते. माझी खेळीदेखील सकारात्मक आणि उत्कृष्ट होती. इतक्या धावा काढूनही विजय मिळत नसेल, तर निराशा येणारच. किती धावा काढल्या यापेक्षा सामना जिंकला का, याला मोठा अर्थ असतो. चांगली खेळी करणे हे वैयक्तिक हितासाठी चांगले आहे; पण संघ जिंकला नाही, याची सल आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात माझी धावा काढण्याची पद्धत चांगली असल्याचे अनेकांचे मत आहे. कामगिरीवर मी सुखावलो, पण संघ पराभूत झाल्याने दु:ख झाले.खेळपट्टीवर स्थिरावणे आणि अधिकाधिक धावा काढणे फलंदाजांसाठी महत्त्वपूर्ण ठरते, असे संघ व्यवस्थापनाच्या बैठकीत आम्ही नेहमी ऐकतो. स्थिरावलेला फलंदाज अखेरपर्यंत टिकला, तर विजय खेचून आणता येतो. मागच्या काही सामन्यांत मी शतक तर ठोकत आहे. पण संघाकडेही पाहावे लागेल. संघ विजयी होत नाही, हीदेखील चिंता आहे. (वृत्तसंस्था)
विजय मिळत नसेल, तर शतक अर्थहीन
By admin | Updated: January 14, 2016 03:13 IST