ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २० : कर्णधार डेव्हीड वॉर्नरने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर झटपट बळी गमावल्याने सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हील्सविरुद्ध २० षटकात ७ बाद १५८ धावापर्यंत मजल मारता आली. डेव्हीड वॉर्नरने ५६ चेंडूत ७३ धावांची आक्रमक खेळी केली.
शिखर धवन(१०) आणि दीपक हूडा(१) अनुक्रमे सहाव्या व सातव्या षटकात धावबाद झाल्याने हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक लावण्यात दिल्लीला यश आले. दहाव्या षटकात ब्रेथवेटने युवराजचा(१०) त्रिफळा उडवून हैदराबादला तिसरा धक्का दिला.
दरम्यान, दिल्लीकरांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. परंतु, वॉर्नरने अपेक्षेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेताना दिल्लीकरांना चोपण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला धवनने सावध भूमिका घेताना वॉर्नरला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्याचा प्रयत्न केला.
अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट टाकत असलेल्या ६व्या षटकातील अखेरच्या चेंडुवर धवनने मारलेला फटका ब्रेथवेटने अडवला. यावेळी धवन क्रीझ सोडून खूप पुढे आला आणि मिळालेली संधी अचूकपणे हेरताना ब्रेथवेटने अप्रतिम फेक करुन धवनला धावबाद केले. यानंतर पुढच्याच षटकात फिरकीपटू अमित मिश्राने आपल्याच गोलंदाजीवर दीपक हूडाला धावबाद करुन हैदराबादाला दुसरा धक्का दिला.
या दोन धक्क्यानंतर हैदराबादच्या धावसंख्येला खीळ बसली. मात्र वॉर्नरने एकबाजू लावून धरताना संघाची धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. परंतु, दहाव्या षटकात युवराज (११ चेंडूत १० धावा)ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्याने हैदराबादच्या अडचणीत भर पडली. वार्नर बाद झाल्यानंतर एकाही फलंदाजाला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. नियमीत अंतराने फलंदाज बाद झाल्याने हैदराबाद संघाच्या धावसंखेला खिळ बसली.
हेन्रिक्स १८, मॉर्गन १४, नमन ओझाने नाबाद १६ धावांची भर घातली. तर शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या भुवनेश्वरने ७ चेंडूत १३ धावांची खेळी करत धावसंख्या वाढवली. दिल्लीकडून कार्लोस ब्रेथवेट ने २ फलंदाजांना बाद केले, झहीर खान आणि ड्युमीनीने प्रत्येकी एका फलंदाजांना बाद केले.