मुंबई : कर्नाटक विरुद्ध पहिल्या डावात घेतलेल्या २१ धावांची आघाडी निर्णायक ठरवताना मुंबईने अनिर्णीत राहिलेल्या सामन्यात ३ गुणांची कमाई करून रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या बाजूला तामिळनाडूने बडोदाचा पराभव केला, तर मध्य प्रदेशने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालवर वर्चस्व गाजवले. या दोन्ही सामन्यांचा फायदा झाल्याने बलाढ्य मुंबईने धडपडत का होईना, आपले आव्हान कायम राखले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईने कर्नाटकसमोर मोठे लक्ष्य ठेवण्याच्या निर्धाराने आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न केला. मात्र कर्णधार विनय कुमारने खेळपट्टीचा रंग ओळखून दोन्ही बाजूने श्रेयश गोपाळ व उदीत पटेल या फिरकीपटूंचा मारा सुरू केला. विनय कुमारची ही चाल यशस्वी ठरली. ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने मुंबईने अखेर आपला दुसरा डाव ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २२३ धावांवर घोषित केला आणि पाहुण्यांसमोर विजयासाठी २४४ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ९८ चेंडू खेळताना ७ चौकार व २ षटकार खेचून सर्वाधिक ७७ धावांची नाबाद खेळी केली. निखिल पाटीलने ४८ चेंडूंत ४८ धावा फटकावल्या. यजमानांच्या आक्रमकतेला मुरड घालण्याचे काम केले ते उदीत पटेलने. त्याने ५५ धावांत ४ खंदे फलंदाज माघारी धाडले. यानंतर आधीच बाद फेरीतील प्रवेश निश्चित झालेला असल्याने कोणताही धोक न पत्करता कर्नाटकने सामन्याची औपचारिकता पूर्ण केली. कर्नाटकच्या फलंदाजांनी संयमी खेळ करत दिवसअखेर १ बाद ११० अशी मजल मारली. (क्रीडा प्रतिनिधी)
हुश्श... पोहोचलो एकदाचे बाद फेरीत
By admin | Updated: February 10, 2015 01:56 IST