नेपियर : वेस्ट इंडीज संघ उद्या (रविवारी) संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) महत्त्वाचा सामना खेळणार आहे. हा सामना निर्विघ्न पार पडण्यासाठी विंडीजला हवामानाची साथ लाभणे गरजेचे आहे. सामन्यादरम्यान विंडीजची नजर एकाच वेळी आकाश व स्कोअरबोर्डकडे लागलेली असेल. दोन वेळचा विजेत्या विंडीजच्या क्वार्टर फायनलच्या आशा या सामन्यातील शानदार विजयावर अवलंबून असतील. पहिल्याच सामन्यात आयर्लंडकडून पराभूत झाल्याने विंडीज संघ ‘ब’ गटात पाचव्या स्थानावर आहे. पाक आणि आयर्लंड हे विंडीजच्या पुढे असल्याने बऱ्याच गोष्टी धावसरासरीवर अवलंबून राहतील. प्रशांत महासागरात दक्षिणेकडे हजारो किमी दूर चक्रीवादळ आले आहे. या वादळाच्या झळा सामन्याला बसू शकतात. पाऊस कोसळल्यास विंडीजच्या आशा मावळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संघ व्यवस्थापक रिची रिचर्डसन यांनी मात्र हवामानाचा फटका बसणार नाही, अशी अपेक्षा वर्तविली. सामना जिंकण्यासाठी उद्या चांगले वातावरण हवे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विंडीजला यूएईवर ७० किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या फरकाने विजय साजरा करावा लागेल. यामुळे त्यांची धावसरासरी पाक आणि आयर्लंडच्या तुलनेत सरस होईल. विंडीजची चिंता ख्रिस गेलची तंदुरुस्ती हीदेखील आहे. पाठदुखीमुळे गेल बुधवारपासून सरावात सहभागी होऊ शकला नव्हता. झिम्बाब्वेविरुद्ध २५१ धावा ठोकल्यापासून गेल चांगला खेळलेला नाही. दुसरीकडे यूएईचा कर्णधार मोहंमद तौकिरला आपला संघ सामना जिंकेल, अशी आशा वाटते. तो म्हणाला, ‘‘पाक आणि द. आफ्रिकेविरुद्ध ५० षटके खेळलो. हे सकारात्मक संकेत म्हणावे लागतील. विंडीज संघ भारत किंवा द. आफ्रिकेसारखा बलाढ्य आहे असे मला वाटत नाही. त्यांच्याविरुद्ध आम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहोत.’’ (वृत्तसंस्था) वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), मार्लोल सॅम्युअल्स (उपकर्णधार), सुलेमान बेन, डॅरेन ब्रावो, जॉनथन कार्टर, शेल्डन कोट्रेल, क्रिस गेल, निकिता मिलर, दीनेश रामदीन (यष्टीरक्षक), केमार रोच, अँड्रे रसल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्ॅवन स्मिथ, जेरॉम टेलर.युनायटेड अरब अमिराती : मोहम्मद तौकिर (कर्णधार), खुरम खान (उपकर्णधार), अमजद अली, अमजद जावेद, अॅड्री बेरेंगर, फहाद अल्हाशमी, मंजुला गुरूगे, कमरान शाझाद, किश्ना चंद्रन, मोहम्मद नावीद, नासीर अझीज, स्वप्नील पाटील (यष्टीरक्षक), रोहन मुस्ताफा, शॅकलेन हैदर, शैमान अनवर.
विंडीजच्या आशा हवामानावर अवलंबून
By admin | Updated: March 14, 2015 22:59 IST