ऑनलाइन लोकमत राजकोट, दि. 18 - सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मंगळवारी गेल वादळ घोंगावले आणि त्याला कर्णधार विराट कोहलीची योग्य साथ लाभली. गेल व कोहली यांनी सलामीला नोंदवलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात लायन्सवर २१ धावांनी मात करुन विजयाचा दुष्काळ संपवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने ७ बाद १९२ पर्यंत मजल मारली.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून ख्रिस गेलने आपल्या मूळ रंगात परताना ३८ चेंडूत ७७ धावा केल्या. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. गुजरात लायन्सकडून ब्रँडन मॅकयुलम (७२) आणि इशान किशन (३९) यांचे प्रयत्न अपुरे पडले. बँगलोरच्या यजुवेंद्र चहलने ३१ धावांत तीन बळी घेतले. गुणतालिकेत आरसीबी ४ गुणांसह खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर केवळ दोन गुणांसह गुजरात अजुनही तळाच्या स्थानावरच आहे.यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातला एका सामन्याचा अपवाद वगळता भक्कम सलामी लाभलेली नाही. सलामीवीर डवेन स्मिथ वारंवार अपयशी ठरत आहे. गेल्या सामन्यात मुंबईविरुध्द शुन्यावर बाद झालेला स्मिथ आज एका धावेवर तंबूत परतला. डोंगराएव्हढ्या लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ त्यामुळे दबावात आला. पण ब्रँडन मॅकयुलम आणि सुरेश रैना यांनी हे बंधन झुगारुन आक्रमक फलंदाजी केली. पण हे आक्रमण अल्पजीवी ठरले. रैना २३ धावांवर बाद झाला. दोघांनी १६ चेंडूत ३६ धावांची भागीदारी केली. रैनानंतर मॅकयुलम आणि फिंचची जोडी जमली. पण फिंच १९ धावा करुन बाद झाला. नेगीच्या गोलंदाजीवर केदार जाधवने त्याला यष्टीचित केले. दिनेश कार्तिकही आल्यापावली परतला. पण सलामीवीर ब्रँडन मॅकयुलम मात्र एका बाजूने घणाघात करीत होता. पण पाचव्या गड्याच्या रुपाने तोही बाद झाला. यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मिल्नेने त्याचा झेल घेतला. मॅकयुलमने ४४ चेंडूत २ चौकार आणि ७ षटकांरासह ७२ धावा केल्या. मॅक्युलम बाद झाल्यानंतर गुजरातच्या आशा संपुष्टात आल्या असे वाटत असताना युवा फलंदाज इशान किसन याने धुमधडाका केला. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांचा ठोका चुकला. किशनचा हा धडाका मिल्ने याने संपुष्टात आणला त्यावेळी आरसीबीचा विजय निश्चित झाला होता. किशनने १६ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३९ धावा केल्या. आरसीबीकडून यजुवेंद्र चहल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने स्मिथ, रैना आणि मॅकयुलम या मोठ्या माशांना जाळ्यात अडकवले.तत्पूवी, गुजरात लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण गेल-कोहली जोडीने सलामीला १२२ धावांची भागीदारी करीत त्यांचा निर्णय चुकला असल्याचे सिद्ध केले.टी-२० त गेलच्या दहा हजार धावाविंडीजचा स्फोटक फलंदाज आणि आरसीबीचा सलामीवीर ख्रिस गेल याने आज टी-२० त दहा हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा जगातील तो पहिला फलंदाज आहे. गुजरात लायन्सविरुद्ध तिसरी धाव घेताच त्याच्या दहा हजार धावा पूर्ण झाल्या. हा त्याचा २९० वा सामना होता. करिअरमध्ये ४० च्या सरासरीने त्याने धावा केल्या. गेलने १८ शतके आणि ६० अर्धशतके ठोकली असून या सामन्याआधी त्याच्या नावावर ७३६ षटकार होते. त्याने ४४.१६ टक्के धावा केवळ षटकारांच्या साहाय्याने केल्या हे विशेष. गेल पाठोपाठ सर्वाधिक धावा ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये ब्रेंडन मॅक्युलम (७५२४) दुसऱ्या आणि ब्रॉड हॉज(७३३८) तिसऱ्या स्थानावर आहे.
अविश्वसनीय झेल...तरीही बचावला गेलआठव्या षटकांत रवींद्र जडेजाच्या अखेरच्या फुलटॉस चेंडूवर ख्रिस गेलने लाँग आॅफकडे उंच फटका मारला. त्याचवेळी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलमने उजवीकडे जलद धावून जात उजव्या हाताने अप्रतिम झेल टिपला देखील. हा अविश्वसनीय झेल घेतेवेळी मॅक्युलमने डोक्यात घातलेल्या टोपीचा कोपरा सीमारेषेला चाटून गेल्याचे रिप्लेमध्ये दिसत होते. त्याचे संपूर्ण शरीर आत असताना केवळ टोपीचा कोपरा सीमारेषेला लागताच रोपमधील ‘रनर’ जागेवरुन हलल्याचे दिसत होते.मैदानी पंचांनी निर्णय देण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतली. काही क्षण खेळ थांबवून अवलोकन केल्यानंतर गेल नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. मॅक्युलमचा या अविश्वसनीय कामगिरीनंतरही गेल बचावला याचीच चर्चा गाजली.संक्षिप्त धावफलकरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु २० षटकांत २ बाद २१३ धावा (ख्रिस गेल ७७,विराट कोहली ६४,ट्रॅव्हिस हेड नाबाद ३०, केदार जाधव नाबाद ३८,धवल कुलकर्णी १/३७, बासिल थम्पी १/३१)गुजरात लायन्स २० षटकांत ७ बाद १९२ धावा (ब्रेंडन मॅक्यूलम ७२,ईशान किशन ३९,सुरेश रैना २३, जडेजा २३, अॅरोन फिंच १९,यजुवेंद्र चहल ३/३१,पवन नेगी १/२१,श्रीनाथ अरविंद १/५३,अॅडम मिल्ने १/४३.)