तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या एकता शिर्केने धर्नुविद्या प्रकारात महिलांच्या इंडियन राऊंडमध्ये मणिपूर संघाच्या खेळाडूचा अंतिम फेरीत ७-३ गुणांनी पराभव करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारातील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. एकताने याआधी महिलांच्या सांघिक गटात कांस्यपदक जिंकून डबल धमाका साजरा केला. महाराष्ट्र संघाने आज दिवसअखेर एकूण ८६ पदके जिंकून पदक तालिकेतील आपले दुसरे स्थान कायम ठेवले.सायकलिंग : महाराष्ट्राच्या अरविंद पनवारने ३६ किलोमीटर वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात ५० मिनिट २८.३७३ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. जलतरण : जलतरणमध्ये महिलांच्या १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या मोनिका गांधीने १:१७.८७ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. शिवराज ससेला दोन कांस्यमहाराष्ट्राच्या शिवराज ससेने पुरुषांच्या वैयक्तिक व सांघिक गटात उत्कृष्ट कामगिरी करून २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात दोन कांस्यपदके जिंकले. पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे सराव करीत शिवराजने वैयक्तिक गटात ५६४ गुणांचे लक्ष्य साधले. सांघिक गटात शिवराजने रौनक पंडित व अक्षय अष्टपुत्रे यांच्यासह १६८२ गुणांची कमाई करून आपले दुसरे कांस्य जिंकले.टेनिसमध्ये दोन कांस्यपदकेटेनिसमध्ये पुरुषांच्या दुहेरीतील उपांत्य फेरीतील महाराष्ट्राच्या नितीन किर्तने व अवनीत बेंद्रे तेलंगणाच्या साकेत मायनेनी व विष्णू वर्धनकडून ०-६, ५-७ असा पराभव पत्कारावा लागत कांस्यपदकावर समाधान लागले. महिलांच्या दुहेरीत प्रार्थना ठोंबरे व रश्मी तेलतुंबडे या जोडीला गुजरातच्या अंकिता रैना व इति मेहता यांच्याकडून ७-५, ४-६, ६-१० असा चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. या जोडीला सुद्धा कांस्यपदक मिळाले.महिलांच्या १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आदिती घुमटकरने ५९.३४ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. या प्रकारात हरियानाच्या शिवानी कटारियाने सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात त्याने ५१.१० सेकंदाची वेळ नोंदविली.महिला संघाने इंडियन राऊंड सांघिक गटात महाराष्ट्राच्या दीक्षा रोडे, रूपाली यमगेर, स्नेहल मानचरे आणि एकता शिर्के यांनी २०२ गुण संपादन करून कांस्यपदक जिंकले. या प्रकारात आसाम संघाने सुवर्णपदक जिंकले.