माउनगुनई : गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर एबी डिव्हिलियर्स (नाबाद ८९) आणि जे़पी़ ड्युमिनी (नाबाद ५८) यांनी झळकावलेल्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर ६ विकेटस्नी मात केली़ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले़ मात्र, किवी संघ ४५़१ षटकांत २३० धावांत गारद झाला़ प्रत्युत्तरात आफ्रिकेने विजयी लक्ष्य ११ चेंडू शिल्लक ठेवून ४८़१ षटकांत पूर्ण करीत सामन्यात बाजी मारली़ या विजयासह आफ्रिकेन ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे़विजयाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली़ त्यांनी अवघ्या ३० धावांत २ गडी गमावले होते़ सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक (९) आणि फाफ डू प्लेसिस (८) हे लवकरच परतले, तर हाशिम आमला याने ३८ धावांचे योगदान दिले़ यानंतर मात्र कर्णधार डिव्हिलियर्स आणि ड्युमिनी यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयात योगदान दिले़ न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट याने २ गडी बाद केले, तर काईल मिल्स आणि कोरी अँडरसन यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़ त्याआधी न्यूझीलंडने ल्युक रोंचीच्या (९९) शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर २३० धावांपर्यंत मजल मारता आली़ डीन ब्रोनलाई याने २४, तर टॉम लॅथम याने २९ धावांचे योगदान दिले़ आफ्रिकेकडून वर्नेन फिलँडर, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर, रियान मॅक्लारेन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना प्रत्येकी २ गडी बाद करताना विजयात योगदान दिले़
आफ्रिकेचा न्यूझीलंडवर शानदार विजय
By admin | Updated: October 22, 2014 05:25 IST