नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये कोणती स्पर्धा चुरशीची होईल, याउलट तिथे सध्या पसरलेल्या झिका व्हायरसचा कशा प्रकारे परिणाम होईल, याचीच चर्चा अधिक होत आहे. विशेष म्हणजे, या व्हायरसच्या धोक्यामुळे काही देशांच्या खेळाडूंनी थेट आॅलिम्पिकमधूनच माघार घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये गोल्फर आणि टेनिसपटूंचा अधिक समावेश आहे.डासांमुळे प्रादुर्भाव होणाऱ्या झिका व्हायरससंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातच सांगितले होते, की दक्षिण अमेरिका खंडात या व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून, ब्राझीलमध्ये तो अधिक प्रमाणात पसरला आहे. वयस्करांसह गरोदर महिलांमध्ये हा आजार अधिक होत असून, नवजात बालके विचित्र शारीरिक आजारांसह जन्म घेत आहेत. यंदाच्या आॅलिम्पिकमधे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ११२ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर गोल्फचे आॅलिम्पिक पुनरागमन होत आहे. मात्र, झिका व्हायरसच्या भीतीमुळे जगातील अव्वल ४ गोल्फरसह अनेक गोल्फरनी माघार घेतल्याने या खेळाची रंगत काही प्रमाणात कमी झाली आहे. माजी अव्वल खेळाडू रोरी मॅक्लरॉय, जॉर्डन स्पिथ, जैसन डे, यूएस ओपन चॅम्पियन डस्टिन जॉन्सन यासारख्या अनेक अव्वल गोल्फरनी आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे.त्याचबरोबर अनेक टेनिसपटूंनीही याच कारणामुळे माघार घेतली असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विम्बल्डन उपविजेता कॅनेडाचा मिलोस राओनिक, झेक प्रजासत्ताकाचा टॉमस बर्डीच, स्पेनचा फेलिसियानो लोपेज, आॅस्टे्रलियाचा बनार्ड टॉमिक आणि रुमानियाची सिमोना हालेप यासारख्या नावाजलेल्या खेळाडूंनी माघार घेतली आहे. तसेच, दोन वेळची आॅस्टे्रलियन ओपनविजेती बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका हिनेदेखील माघार घेतली आहे. (वृत्तसंस्था)
माघार घेण्यात गोल्फर व टेनिसपटू आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 05:32 IST