नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय संघ लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत अधिक पदक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केलेल्या केंद्र सरकारने आता २०२४च्या आॅलिम्पिकसाठी ५० पदकांचे लक्ष्य ठेवले आहे. गुरुवारी याबाबत माहिती देताना सरकारने म्हटले, की ‘निती आयोगाने भविष्यात २०२४ आॅलिम्पिक खेळासाठी ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.’ रत्नलाल कटारिया यांच्या प्रश्नावर लोकसभेत लिखित उत्तर देताना केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले, की निती आयोगाने ‘आओ खेले’नामक एक पुस्तक प्रकाशित केले असून त्यामध्ये २०२४मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये ५० पदके जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयकाच्या नियोजनावार सध्या विविध शुभचिंतकांसह चर्चा होत आहे. ही योजना सुरू करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत,’ असेही गोयल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)