बंगळुरू : संततधार पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने अखेरचे चार दिवस खेळच होऊ शकला नाही. अशा अवस्थेत बुधवारी भारत-द. आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णीत संपविण्यात आला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. तिसरा सामना नागपुरात २५ नोव्हेंबरपासून खेळला जाईल.चार दिवसांत एकही चेंडू न पडणे ही भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. एका दशकाआधी चेन्नईत भारत-श्रीलंकादरम्यान झालेल्या कसोटीत तीन दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नव्हता. पाचव्या दिवशी सकाळी हलक्या सरी आल्या; पण रात्रभर झालेल्या पावसामुळे अखेरचा दिवसही पाण्यात जाणार हे निश्चित होते. मैदानावर ज्या ठिकाणी कव्हर नव्हते तेथे पाण्याचे डबके साचले होते. मैदान कर्मचाऱ्यांनी आपल्या पद्धतीने पाणी काढण्याची मेहनत केली. सुपर सोकर्सचा उपयोगदेखील करण्यात आला; पण क्षेत्ररक्षकांसाठी धोकादायक असल्याचे पंचांच्या लक्षात येताच सामना संपविण्याची घोषणा करण्यात आली. द. आफ्रिकेचा स्टार एबी डिव्हिलियर्स याचा हा शंभरावा सामना होता.गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. द. आफ्रिकेला तीन सत्रांत बाद करणे फार कमी वेळा घडते. आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताच अनेकांना आश्चर्य वाटले. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते; पण येथे गोलंदाजांनी कमाल केली. भक्कम स्थितीत असताना चार दिवस वाया गेल्याची निराशा आहे. शिखरचा फॉर्म परतला ही आणखी समाधान देणारी बाब. आम्ही काहीही बदल केला नाही. मोहालीत मिळालेल्या आत्मविश्वासामुळे बंगळुरू येथे पहिल्याच दिवशी चमकदार कामगिरी बजावली. संघ चांगल्या मूडमध्ये असल्याने पुढे व्यत्यय येणार नाही, या आशेसह नागपुरात कौशल्य पणाला लावून दिमाखदार विजय नोंदविणार आहोत.- विराट कोहली, कर्णधार भारत.चार दिवस क्रिकेट खेळू शकलो नाही याची निराशा आहे. हा सामना दोन्ही संघांकडे झुकू शकला असता. एबीने शतकी कसोटीत ८५ धावा केल्याचा आनंद झाला. त्याच्यासोबत या क्षणाचा आनंद लुटला; पण दुर्दैवाने आमची फलंदाजी ढेपाळली. जितका वेळ होता तो पाहता हा सामना बरोबरीचा होता, असे म्हणावे लागेल.- हशिम अमला, कर्णधार, द. आफ्रिका.
चार दिवसांचा खेळ पाण्यात
By admin | Updated: November 19, 2015 04:49 IST