ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - बीसीसीआयने डंकन फ्लेचर यांची हकालपट्टी केल्यास ग्रेग चॅपल यांच्यानंतर प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी झालेले फ्लेचर हे दुसरे परदेशी प्रशिक्षक ठरणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने दिमाखदार विजय मिळवले त्याच इंग्लंडविरोधात भारतीय संघाने सपाटून मार खाल्ल्याने फ्लेचर यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.
२००५ मध्ये ग्रेग चॅपल यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळात २००७ च्या विश्वचषकात भारत पहिल्या फेरीतच बाद झाला होता. याशिवाय सौरव गांगुली आणि अन्य वरिष्ठ खेळाडूंसोबतचे वाद यामुळे चॅपल यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. संघ घडवण्यात चॅपल सपशेल अपयशी ठरल्याने दोन वर्षांतच त्यांना प्रशिक्षकपदावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर काही महिने रवि शास्त्री आणि रॉबिन सिंग यांच्याकडे प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकपदाची धूरा सोपवण्यात आली होती. त्यानंतर गॅरी कस्टर्न यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. गुरु कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यशस्वी घौडदौड केली.
२०११ मध्ये कस्टर्न यांच्यानंतर डंकन फ्लेचर यांची भारताच्या प्रशिक्षकपदावर वर्णी लागली. फ्लेचर यांनी तब्बल आठ वर्ष इंग्लंड संघाचे प्रशिक्षक म्हणून कामकाज पाहिले होते. त्यांच्या कारकिर्दीत इंग्लंडने परदेश आणि स्वदेशात दिमाखदार विजय मिळवले. या कामगिरीसाठी फ्लेचर यांना इंग्लंडमधील नागरी पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. मात्र अखेरच्या टप्प्यात फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणा-या इंग्लंड संघाची पिछेहाट सुरु झाली व त्यांना प्रशिक्षकपदावरुन काढून टाकण्यात आले. आता त्याच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने सपाटून मार खाल्ल्याने फ्लेचर यांना भारताचे प्रशिक्षकपद सोडावे लागेल असे दिसते.