आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत -पुणे, दि. 14 - आयपीएल १०च्या प्ले आॅफच्या पहिल्या तीन स्थानांचा निकाल शनिवारच्या सामन्यांमध्ये लागला आहे. मात्र अखेरच्या स्थानी पुणे की पंजाब याचा निकाल आजच्या सामन्यानंतर लागेल. जिंकणारा संघ प्ले आॅफमध्ये पोहचले.आता पुणे संघाचे १६ गुण आहेत. तर पंजाबचे १४ गुण आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास पुणे संघाचे १८ गुण होतील आणि पुणे थेट दुसऱ्या स्थानावर पोहचेल. मात्र जर पंजाब जिंकला तर १६ गुणांसह नेट रनरेटच्या आधारावर पंजाब चौथ्या स्थानावर पोहचेल.आयपीएल १०च्या सुरूवातीच्या सत्रात पंजाबला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मात्र मॅक्सवेलच्या शानदार नेतृत्वात पंजाबने कात टाकली आणि गुणतक्त्यात झेप घेतली. मॅक्सवेल, साहा, गुप्तील, आमला यासारख्या फलंदाजांच्या जोरावर पंजाबने सत्रात विजय मिळवला आहे. मॅक्सवेलची तुफानी खेळी कायमच संघाच्या मदतीला आली आहे. गेल्या सामन्यात आमलाच्या अनुपस्थितीत साहाला सलामीला पाठवले गेले. त्याने देखील या संधीचे सोने करत मुंबई इंडियन्स विरोधात दमदार खेळी केली होती. पंजाबच्या गोलंदाजीची मदार मोहित शर्मा, संदीप शर्मा, युवा राहूल तेवतिया यांच्यावर आहे. इशांतशर्माला किंग्ज पंजाबने अखेरच्या काही दिवसांत विकत घेतले. मात्र अजून पर्यंत त्याला एकही बळी मिळालेला नाही.पुणे संघाकडे मॅचविनर्स खेळाडूंचा भरणा आहे. इम्रान ताहीर परतला असला तरी पुण्याच्या गोलंदाजीची धुरा जयदेव उनाडकट, बेन स्टोंक्स, अॅडम झाम्पा यांच्यावर आहे. मात्र सोबतच मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि वॉशिग्टन सुंदरयांनाही या अटीतटीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करावी लागेल. सलामीवीर अजिंक्य रहाणेची बॅट गेल्या काही सामन्यांपासून तळपलेली नाही. या सत्रात त्याला फक्त एकदाच अर्धशतक झळकावता आले आहे. राहूल त्रिपाठीलादेखील गेल्या दोन सामन्यात सूर सापडलेला नाही. त्यामुळे फलंदाजीचा भार कर्णधार स्टिव्ह स्मिथ, मनोज तिवारी, बेन स्टोंक्स, महेंद्र सिंह धोनी यांच्यावर आहे. पुण्याचा संघ एक वेळ तळाच्या स्थानाला होता. मात्र स्मिथ आणि कंपनीने सलग सामने जिंकत गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्यांना पंजाबवर विजय मिळवावाच लागेल. नाहीतर या सत्रात पुण्याने घेतलेली मेहनत पाण्यात जाईल. प्ले आॅफ आणि क्वालिफायरचे गणित या सामन्यावर अवलंबून आहे. पुण्याने विजय मिळवला तर दुसऱ्या स्थानासह ते क्वालिफायर गाठतील. नाहीतर स्पर्धेबाहेर पडतील. आणि पंजाबने विजय मिळवला तर पंजाब १६ गुण आणि नेट रनरेटच्या आधारावर प्ले आॅफमध्ये प्रवेश करेल.
प्ले आॅफच्या अखेरच्या स्थानासाठी लढत
By admin | Updated: May 14, 2017 07:26 IST