मुंबई : सध्या देशात आयपीएलची धूम सुरू असताना आगामी २७ एप्रिल ते १८ मेदरम्यान मुंबईत टी-२० क्रिकेट लीगचा धमाका रंगणार आहे. नवोदित खेळाडूंना अनुभवी व्यावसायिक व वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव मिळण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या टी-२० क्रिकेट लीगचे यंदाचे ५ वे सत्र आहे.ज्वाला स्पोटर््स फाउंडेशनच्या वतीने आयोजित ही क्रिकेट लीग स्पर्धा मरिन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखाना येथे रंगणार असून, या स्पर्धेत ५ संघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक संघाचा कर्णधार हा रणजीपटू किंवा व्यावसायिक खेळाडू असल्याने त्याच्यावर संघाच्या नेतृत्वासोबतच नवोदितांना मार्गदर्शन करण्याची दुहेरी जबाबदारी देखील आहे.एकूण २ ते ३ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेत बांद्रा हीरोज, मुंबई पोलीस सिटी रायडर्स, घाटकोपर जेंट्स, शिवाजी पार्क वॉरिअर्स आणि ठाणे मराठा हे संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील. यामध्ये गेल्या दोन सत्रांत विजेतेपद पटकावलेल्या बलाढ्य मुंबई पोलीस सिटी रायडर्सला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. प्रत्येक संघ एकमेकाविरुद्ध दोन वेळा खेळणार असून, शेवटच्या स्थानी आलेला संघ स्पर्धेबाहेर जाईल. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईत होणार टी-२०चा धमाका
By admin | Updated: April 25, 2015 00:04 IST