ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ४ : डोपिंग स्कॅन्डलमुळे उत्साहावर काहीसे विरजण पडले तरीही शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत्असलेल्या ३१ व्या आॅलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसहअधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.भारतीय पथकातील ११८ खेळाडू पदकांची संख्या दुप्पट करण्याच्या प्रयत्नात निश्चितच असतील. धावपटू धरमवीर आणि गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने त्यांना भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. याआधी नरसिंगदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता पण नाडाच्या सुनावणीत तो सहीसलामत बाहेर पडल्यामुळे आणि विश्व कुस्ती महासंघाने परवानगी बहाल केल्याने नरसिंग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.शनिवारी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जबर फॉर्ममध्ये असलेला नेमबाज जीतू राय याच्या ५० मीटर पिस्तुल तसेच १० मीेटर एअर पिस्तुल प्रकारावर नजर असेल. तो रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे शिवाय विश्वचषकात दोन सुवर्ण, दोन रौप्य तसेच एक कांस्य पदकाचा मानकरी आहे. आशियाड आणि राष्ट्रकुलचा सुवर्ण विजेता देखील आहे. जीतूकडून दोन्ही प्रकारात पदकाची आशा आहे.
अभिनव बिंद्रा ध्वजवाहकपाचवे आणि अखेरचे आॅलिम्पिक खेळणारा अभिनव बिंद्रा उद्घाटनाच्या सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक असेल. पुन्हा एकदा सुवर्ण पटकावीत निवृत्त होण्याचा त्याचा निर्धार कायम आहे. गगन नारंग हा देखील तीन प्रकारात सहभागी होत असून हे त्याचे चौथे आॅलिम्पिक आहे. हीना सिद्धू अयोनिका पाल, आणि अपूर्वी चंदेला महिला गटात दावेदारी सादर करतील.
कुस्तीत नरसिंग सर्व वाद मागे सारून ७४ किलो फ्री स्टाईलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता योगेश्वर दत्त ६५ किलो फ्री स्टाईलमध्ये लढणार आहे. कुस्तीत आठ मल्ल फ्री स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला गटात खेळणार आहेत. लंडनमध्ये गीता फोगाट आॅलिम्पिक खेळणारी पहिली भारतीय महिला होती. यंदा विनेश फोगाट ४८ किलो, बबिता कुमारी ५३ किलो, साक्षी मलिक ५८ किलो या तीन महिला रिंगणात आहेत. विनेशने पात्रता स्पर्धेत विश्व चॅम्पियनशिपची रौप्य विजेती इवोना मॅल्कोव्हस्का हिला नमविले होते.बॉक्सिंगमध्ये लंडनमध्ये आठ बॉक्सर होते तर येथे केवळ तीन बॉक्सर असतील. शिवा थापा ५६, विकास कृष्णन ७५ तसेच मनोज कुमार ६४ यांच्यावर भिस्त आहे. लंडनमध्ये अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेले तिरंदाज १५ दिवसांआधीच येथे दाखल झाले आहेत. तिसऱ्यांदा आॅलिम्पिक खेळणारी बोंबाल्या देवी, माजी विश्व नंबर वन दीपिका कुमारी आणि लक्ष्मीराणी मांझी यांच्या संघाकडून पदकाची आशा राहील.
टेनिसपटूंवरही भिस्तटेनिसमध्ये देखील रिओला पोहोचेपर्यंत वाद गाजले. रोहण बोपन्नाने अनुभवी लियांडर पेससोबत न खेळता साकेत मिनेनीला दुहेरीचा पार्टनर म्हणून पसंती दर्शविली होती पण एआयटीएने वेळीच वादाला तिलांजली दिली. अटलांटा आॅलिम्पिकचा कांस्य विजेता पेसचे हे सलग सातवे आॅलिम्पिक आहे. तो देखील पदकासह निवृत्त होऊ इच्छितो. मिश्र दुहेरीत सानिया- बोपन्नाकडून अपेक्षा आहेत.
बॅडमिंटनमध्ये भारताची सर्वांत मोठी आशा सायना नेहवाल असेल. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सानियाला यंदा रौप्य किंवा सुवर्ण जिंकण्याची संधी राहील. जिम्नॅस्टिकमध्ये २२ वर्षांची दीपा करमाकर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय ठरली. तिच्याकडूनही अपेक्षा राहतील. भारतीय महिला हॉकी संघ ३६ वर्षानंतर पात्र ठरला. पी. आर. ब्रिजेशच्यानेतृत्वाखालील पुरुष हॉकी संघाकडूनही पहिल्या टप्प्यात उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची अपेक्षा आहे. भारताला अर्जेंटिना, कॅनडा, जर्मनी, आयर्लंड आणि नेदरलॅन्ड या संघांच्या गटात स्थान देण्यात आले.
गोल्फचे ११२ वर्षानंतर आॅलिम्पिकमध्ये पुनरागमन झाले. भारताकडून अनिर्बान लाहिरी, एसएसपी चौरसिया आणि १८ वर्षांची आदिती अशोक सहभागी होत आहेत. अॅथ्लेटिक्समध्ये सर्वांत मोठे पथक आहे. पण पदकाची अपेक्षा करणे चुकीचेठरेल. मिल्कासिंग, पी. टी. उषा, आणि अंजू बॉबी जॉर्ज यांनी पदकापर्यंत तरी झेप घेतली पण यंदा उपांत्य फेरी गाठली तरी भारतासाठी अॅथ्लेटिक्समध्ये पदक जिंकल्यासारखेच असेल. थाळीफेकपटू विकास गौडाचे हे तिसरे आॅलिम्पिक असेल. तिहेरी उडीत रंजीत माहेश्वरी आणि स्टीपल चेसमध्ये ललिता बाबर, सुधासिंग तसेच ओ. पी. जैशा आव्हान सादर करणार आहेत. दुतीचंद ही ३६ वर्षांनंतर आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला वेगवान धावपटू आहे. भारत ज्युडो, नौकायान,जलतरण, टेबल टेनिस, आणि भारोत्तोलन या प्रकारातही सहभागी होणार आहे. भारताने २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्येतीन तसेच २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सहा पदकांची कमाई केलीहोती.आॅलिम्पिक उद्घाटन सोहळा, शनिवारी पहाटे ४.३० पासून३१ व्या आॅलिम्पिकचा उद्घाटन सोहळा ७५ हजारच्यावर प्रेषक क्षमता असलेल्या रिओच्या माराकाना स्टेडियममध्ये ५ आॅगस्ट रोजी ब्राझीलच्या स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजेपासून सुरू होणार आहे. भारत ब्राझीलच्या तुलनेत ९.३० तासांनी पुढे असल्याने भारतात समारंभाचे थेट प्रक्षेपण शनिवारी पहाटे ४.३० पासून दिसणार आहे. सुमारे चार तास हा समारंभ चालेल. भारतात स्टार स्पोर्टस्च्या आठ चॅनेल्सवर आॅलिम्पिकचे थेट प्रक्षेपण होईल.यांच्याकडून अपेक्षा...अभिनव बिंद्रा, गगन नारंग, जीतू राय, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू,नरसिंग यादव, सानिया मिर्झा, लियांडर पेस, रोहण बोपन्ना, शिवा थापा,विकास कृष्णन, दीपिका कुमारी, दीपा करमाकर, विकास गौडा तसेच पुरुष हॉकीसंघ.भारताचे आव्हान...तीरंदाजी ४, अॅथ्लेटिक्स ३३, बॅडमिंटन ७, बॉक्सिंग ३, हॉकी (पुरुष वमहिला) ३६, गोल्फ ३, जिम्नॅस्टिक १, ज्युडो १, नौकायान १, नेमबाजी १२,जलतरण २, टेबल टेनिस ४, टेनिस ४, वेटलिफ्टिंग २, कुस्ती ८.आकड्यात आॅलिम्पिक...५ ते २१ आॅगस्ट रिओएकूण देश २०६खेळाडू ११ हजारस्पर्धा प्रकार ३०६आयोजन स्थळे ३२.